30000 रुपयाची लाच घेताना तलाठी, खाजगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – वडिलोपार्जीत जमीन नावावर करून देण्यासाठी 30 हजार रुपयाची लाच घेताना तलाठी आणि खाजगी इसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (शनिवार) मुखेड तालुक्यातील सज्जा चांदोळा या ठिकाणी करण्यात आली. तलाठी उदयकुमार लक्ष्मणराव मीसाळे (वय-47 रा. सावित्रीबाई फुले नगर, कनाल रोड, नांदेड) आणि खासगी इसम राहुल प्रल्हादराव परांडे (वय-35 रा. सावित्रीबाई फुले नगर, कनाल रोड, नांदेड) असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीने नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 29 जुलै रोजी तक्रार केली. तक्रारदार यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या नावावर असलेली जमीन तक्रारदार, त्यांचे भाऊ आणि बहिणीच्या नावाने करून फेरफार करण्यासाठी अर्ज केला होता. जमीन नावावर करून देण्यासाठी सज्जा चांदोळा येथील तलाठी उदयकुमार मीसाळे यांने तक्रादाराकडे 40 हजार रुपयाची लाच मागितली. तडजोडीमध्ये 30 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारदार यांच्या तक्रारीवरून पडताळणी केली असता तलाठी मीसाळे याने खासगी इसम राहुल परांडे याच्यामार्फत लाच स्विकारण्याचे मान्य केले. आज तलाठी कार्यालयात सापळा रचला. खाजगी इसम परांडे याने तक्रारदार यांच्याकडून तलाठी मीसाळे यांच्या सांगण्यावरून लाच स्विकारताच अटक करण्यात आली. मीसाळे आणि परांडे या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल पखाले, पोलीस नाईक बालाजी तेलंगे, गणेश तालकोकूलवार, सचिन गायकवाड, अंकुश गाडेकर, मारोती सोनटक्के यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.