शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीला 4 वर्षांची शिक्षा

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन – आठ वर्षापूर्वी शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी शंकर वीरकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीला ठाणे न्यायालयाने 4 वर्षाचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी 6 महिने कैद भोगावी लागेल असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

मधुकांत बालाभाईं कल्सारिया असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी हा शिवसेनेच्या पदाधिकारी असलेल्या स्नेहल सावंत – कल्सारिया यांचे पती आहेत.

याबाबतची माहिती अशी की, काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील सृष्टी वसाहतीत राहणाऱ्या स्नेहल कल्सारिया यांच्या घरात 1 फेब्रुवारी 2012 रोजी रात्री सदरची घटना घडली होती. वीरकर यांच्यासोबत मधुकांत यांचा वाद झाला आणि त्यावेळी मधुकांत यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून वीरकरवर गोळी झाडली होती. गोळी ही वीरकर यांच्या कानाखालून शर्टाच्या कॉलर ला भोक पडून गेली. वीरकर यांचे दैव बलवत्तर म्हणून बचावले होते. या घटनेने त्यावेळी खळबळ उडाली होती.

त्यावेळी पोलीस निरीक्षक असलेले अनिल पाटील यांनी आरोपीला अटक करून गुन्ह्याचा सर्व तपास केला होता. हत्येचा प्रयत्न तसेच शस्त्रास्त्र कायद्यातील कलामांखाली गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ठाण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश गोंधळीकर यांच्याकडे सुनावणी झाली. पोलिसांनी केलेला तपास आणि सबळ पुराव्यांच्या आधारे मधुकांत य़ाला दोषी ठरवत न्यायालयाने 4 वर्षांची कैद आणि 50 हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी 6 महिने कैद भोगावी लागेल असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

वीरकर हे सध्या शिवसेनेचे मीरा भाईंदर उपजिल्हा प्रमुख आहेत तर स्नेहल सावंत – कल्सारिया ह्या शिवसेनेच्या मीरा भाईंदर महिला जिल्हा संघटक आहेत. आरोपीला किमान 7 वर्षांची शिक्षा व्हावी असे अपेक्षित होते. परंतु न्यायालयाने दिलेल्या शिक्षेवर आपण समाधानी आहोत. त्यावेळी आरोपी जवळ असल्याने पिस्तूल धरता आली. तरी देखील गोळी शर्टाची कॉलर भेदून गेली. देवाच्या कृपेने वाचलो अशी प्रतिक्रिया शंकर वीरकर यांनी दिली आहे.