फसवणूक प्रकरणातील आरोपीला 2 वर्षे साधी कैद

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – घरातील वृध्द व्यक्तींना भांडी आणि दागिने पॉलिश करून देण्याचा बहाण्याने दागिने लंपास करणा-या आरोपीला कल्याण न्यायालयाने गुरूवारी (दि. 24) 2 वर्षे 3 महिने साधी कैद आणि 1 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

विनोदप्रसाद मुकेशप्रसाद शाह (वय 48 ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला 2018 मध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक केली गेली होती.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, या गुन्ह्याचा समांतर तपास करणा-या पोलीस उपायुक्तांच्या तत्कालीन अँटी रॉबरी स्कॉडने शाहला गुजरात येथील नाडीयाद येथून अटक केली होती. गुन्हयाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. विशेष म्हणजे आरोपीने जानेवारी 2018 ते डिसेंबर 2020 या कालावधीत कल्याण न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायालय ते उच्च न्यायालयार्यंत पाच वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. परंतू न्यायालयाने जामिन नामंजूर केला होता. आरोपीवर असलेल्या इतर 13 गुन्हयात जामीन होऊनही फसवणूकीच्या गुन्ह्यात जामीन नामंजूर झाला होता. गुन्ह्यातील पुरावे व कागदपत्रंमुळे कोरोनाच्या परिस्थितीतही आरोपीला जामीन मिळाला नाही.

अखेर गुरूवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील पहिले न्यायालयाने आरोपी शाह ला 2 वर्षे 3 महिने साधी कैद आणि 1 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंड न भरल्यास 5 दिवस साधी त्याला भोगावी लागणार आहे.