दिव्यांगांनी खचून न जाता उत्तुंग यश मिळवावे : पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एनएडब्ल्यूपीसीच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी खरचं माझ्याकडे शब्द नाहीत. राहुल देशमुख स्वतः अंध असुन त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन प्रचंड मोठे कार्य उभे केले आहे. आपल्याला प्रत्यक्षात देव दिसत नाही; पण तो राहुल व देवता देशुमख यांच्या रुपानं आपल्याला भेटतो. या संस्थेतीन नेत्रहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांकडे खूप सारे टॅलेंट्स आहेत, क्षमता आहेत. या विद्यार्थ्यांनी खचून न जाता समाजात उत्तुंग स्थान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत”, असे मत पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी व्यक्त केले.

सदाशिव पेठेतील नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड् संस्थेच्या वतीने दिव्यांगांना शिष्यवृत्ती आणि सेवेत समाविष्ट झालेल्यांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, कवयत्री ललिता सबनीस, अंजली कोद्रे व दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस म्हणाले की, “राहुल व देवताचा हा व्यापक व आगळा-वेगळा संसार पाहून इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं ह्रदय द्रवल्याशिवाय राहत नाही. मग तो कुठल्याही क्षेत्रातला असो, कितीही निगरगठ्ठ असो त्याच्यातलं माणूसपण इथे आल्यावर जागं झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या कार्यानं पावन झालेली हि NAWPC संस्थेची जागा आहे जिथे नेत्रहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान व संगणक शिक्षणाच्या मदतीने सक्षम बनविण्याचे कार्य अव्याहतपणे चालू आहे. ज्यामुळे या विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या वाटा गवसतात, नोकऱ्या मिळतात, त्यांची आयुष्य उभी राहतात. म्हणूनच राहुल व देवता देशमुखांच हे कार्य इतर सगळ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल देशमुख यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.
विश्वस्त देवता अंदुरे देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.