Confirm : अभिनेता इम्रान खानचा अभिनयातून सन्यास !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आणि अभिनेता आमीर खान (Aamir Khan)चा भाचा इम्रान खान (Imran Khan) यानं अ‍ॅक्टिंग सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असणाऱ्या इम्राननं आता अभिनयाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रानचा जवळचा मित्र आणि अभिनेता अक्षय ओबेरॉय (Akshay Oberoi) यानं एका मुलाखतीत याबाबत सांगितलं आहे. इम्रान खाननं अभिनय न करण्याचा निर्णय घेतला आहे, असं अक्षयनं स्पष्ट केलं आहे.

मुलाखतीत बोलताना अक्षय म्हणाला, माझा सर्वांत जवळचा मित्र इम्रान खान आता अभिनेता म्हणून काम करणार नाही. त्यानं अभिनय सोडला आहे. तो माझा एवढा जवळचा मित्र आहे की, मदतीसाठी मी त्याला पहाटे 4 वाजताही कॉल करू शकतो. गेल्या 18 वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो आहोत.

अभिनयानंतर आता इम्रानची भविष्यातली योजना काय आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर अक्षयनं स्पष्ट असं काही उत्तर दिलं नाही. परंतु इम्रान अभिनय सोडून दिग्दर्शनात पाऊल टाकेल अशी त्याला आशा आहे. त्याच्या मते इम्रानला सिनेमाबद्दल चांगली समज आहे. तो एखाद्या सिनेमाचं दिग्दर्शन करू शकतो, परंतु सध्या तरी त्याला प्रसिद्धीपासून दूर राहायचं आहे.

इम्रानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो कट्टी बट्टी या सिनेमात अखेरचा दिसला होता. या सिनेमात त्यानं कंगना रणौत सोबत काम केलं होतं. इम्राननं जाने तू या जाने ना, किडनॅप, लक, आय हेट लव्ह स्टोरी अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. देल्ली बेली या सिनेमातील त्याच्या कामाचं कौतुकही झालं आहे. याशिवाय आमीर खानच्या कयामत से कयामत तक आणि जो जीता वही सिकंदर या सिनेमातही इम्राननं बाल कलाकार म्हणून काम केलं आहे. 2008 साली त्यानं बॉलिवूड डेब्यू केला होता. 2015 पर्यंत तो सिनेमात सक्रिय होता.