‘विनोद’वीर जगदीप यांच्या भूमिकेमुळे पं. नेहरु देखील झाले होते ‘प्रभावित’

राधिका पार्थ : करोडो लोकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘शोले’ सिनेमातील सूरमा भोपालीची भूमिका करणारे विनोदवीर जगदीप यांचं ८१ व्या वर्षी निधन झाले. जगदीप आपल्या विनोदी भूमिकेमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवत होते. जगदीप यांची मुले जावेद जाफरी आणि नावेद जाफरी यांनीदेखील आपल्या वडिलांसारखे विनोदविश्वात स्वतःची ओळख तयार केली आहे. जगदीप यांना शोले सिनेमातील भूमिकेमुळे सर्वात जास्त ओळखले जाते.

जगदीप यांच्या लोकप्रिय ठरलेल्या ‘हम पंछी एक डाल के’ या सिनेमातील भूमिकेमुळे तत्कालिन देशाचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी आपला एक स्टाफ त्यांच्या देखरेखीसाठी भेट दिला होता. २०१२ मध्ये रूमी जाफरी यांचा ‘गली गली में चोर है’ हा सिनेमा जगदीप यांचा शेवटचा सिनेमा ठरला. जगदीप यांना २०१९ मध्ये पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारत-पाकिस्तान फाळणी वेळी जगदीप आपल्या आईसोबत भारतात आले होते. त्यांचे लहानपण गरिबीमध्ये गेले आणि काही दिवस त्यांना पदपथावर आपले जीवन व्यतीत करावे लागले होते. दैनंदिन उदरनिर्वाहासाठी त्यांनी सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी बाल कलाकार म्हणून सिनेमामध्ये काम केले. बी. आर चोपडा यांच्या ‘अफसाना’ या सिनेमापासून त्यांना पहिला ब्रेक मिळाला.

जगदीप यांनी सिनेसृष्टीत सुमारे ४०० हून अधिक सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. भाभी सिनेमातील ‘चली चली रे पतंग’ या गाण्यातूनदेखील जगदीप लोकांच्या स्मरणात राहिले. जगदीप यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. जाॅनी लिव्हर, अनिल कपूर, अजय देवगण, अनुपम खेर, संजय मिश्रा या दिग्गजांनी जगदीप यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.