Video : अभिनेते प्रशांत दामलेंना ‘कोरोना’ची लागण ! म्हणाले- ‘इथेपण मी काठावर पास’

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना कोरोनाची लागण झाली आहे. एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे रिओपनिंगचे प्रयोग त्यांनी रद्द केले आहेत. फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी याविषयी माहिती दिली आहे. ते 7 दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले प्रशांत दामले ?

शेअर केलेल्या व्हिडीओत बोलताना प्रशांत दामले म्हणाले, मागच्या रविवारी चिंचवडचा प्रयोग झाला तेव्हा मला कणकण वाटत होती. त्यामुळं बुधवारी मुंबईत आल्यानंतर मी कोरोना टेस्ट करून घेतली. शाळेप्रमाणे इथेपण मी काठवर पास झालो आहे. डॉक्टर म्हणाले की, काठावर जरी असलं तरी 7 दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे. त्यामुळं आता उद्या दुपारचा बोरिवलीचा प्रयोग आणि परवा दुपारचा गडकरी रंगायतनचा प्रयोग रद्द करावे लागले आहेत.

पुढं ते म्हणाले, मी ठणठणीत आहे. परंतु डॉक्टर आराम करण्यासाठी सांगत आहेत. दिलासादायक बाब अशी की, माझे सर्व सहकलाकार, बॅक स्टेजचे आर्टीस्ट हे ठणठणीत आहेत. मीच जरा काठावर आहे. मीही काळजी घेतो तुम्हीही घ्या असं ते म्हणाले आहेत. दामलेंनी खूप विनोदी पद्धतीनं हे सर्व सांगितलं आहे.