अभिनेत्री झारा खानला धमकी देणारी महिला गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियावरून शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची तक्रार ज्येष्ठ अभिनेत्री सलमा आगा यांची कन्या अभिनेत्री व गायिका झारा खान हिने ओशिवरा पोलिसांत दिली होती. त्याप्रकरणी बुधवारी ओशिवरा पोलिसांनी नेहा सरवर (३९) हिला अटक केली. ती खासगी मार्केटिंग कंपनीत काम करते. बॉलीवूडमधील अन्य काही सेलिब्रिटींनाही तिने अशाच प्रकारे धमकावल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

दरम्यान, नेहा सोशल मीडियावर पुरुषांच्या नावे बनावट आयडी बनवून धमकी देत हाेती. झारा स्वतःला ‘मेसेंजर ऑफ गॉड’ (देवाचा संदेश देणारी) समजते, ज्याला नेहाचा विरोध होता म्हणून ती असे वागल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी ­सांगितले. जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची तक्रार झाराने दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक तपासाअंती हैदराबाद येथे राहणाऱ्या नेहाची माहिती मिळविली. तिला १९ डिसेंबर, २०२० रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली. मात्र ती हजर न झाल्याने तिला पुन्हा नोटीस बजावली. बुधवारी ती ओशिवरा पोलीस ठाण्यात आल्यावर चाैकशीअंती तिला अटक झाली.

झारा खानसह तिने साहिल पीरजादे, कुशल टंडन, कमाल खान आणि एजाज खान यांनाही अशाच प्रकारे धमकावल्याचे तपासात उघड झाले आहे. ‘आरोपी महिलेने अशा प्रकारे बनावट आयडी बनवत आणखी काही लोकांना धमकावले आहे का?’ याबाबत चौकशी सुरू आहे.