11 वी प्रवेश : विशेष फेरीत 4 हजार 910 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यांत 11 वीच्या सध्या सुरू असलेल्‍या प्रवेश प्रक्रियेंतर्गत सोमवारी (दि. 28) विशेष फेरीची यादी जाहीर केली आहे. या यादीत विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्‍या पसंतीक्रमानुसार 4 हजार 910 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्‍ध करून देण्यात आली आहे. यादीत नावे असलेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी गुरुवार (दि.31) पर्यंत मुदत राहणार आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांत 11 वी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीभूत प्रक्रिया राबविली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत झालेल्या 3 फेऱ्यांमध्ये सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली होती. तरीदेखील 10 हजाराहून अधिक जागा रिक्‍त होत्‍या. या जागांवर प्रवेशासाठी शिक्षण विभागातर्फे विशेष फेरी राबविण्यात आली. या फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली आहे. राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्‍या धोरणानुसार एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्‍ल्‍यूएस प्रवर्गाचा लाभ देण्यास मान्‍यता दिल्याने अशा विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्‍ती करण्यासाठी मुदत दिल्‍याने यादी उशिराने जाहीर केली आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत आपले प्रवेश निश्‍चित करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

पात्र विद्यार्थ्यांची शाखानिहाय संख्या
विज्ञान – 2 हजार 327
वाणिज्‍य – 1 हजार 728
कला – 717
एचएसव्‍हीसी – 138

ईडब्‍ल्‍यूएस, खुल्‍या प्रवर्गा‍चा कट ऑफ उंचावला
एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्‍ल्‍यूएस प्रवर्गातून अर्ज सादर करण्याची संधी दिलेली होती. यातून विशेष फेरीच्‍या गुणवत्तायादीत खुल्‍या प्रवर्गासह ईडब्‍ल्‍यूएस प्रवर्गातील कट ऑफदेखील उंचावला. त्यामुळे विज्ञान शाखेत नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना धडपड करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.