अफगाणिस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 31 जणांचा मृत्यू, 50 जखमी

काबूल : वृत्तसंस्था
अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये मतदार आणि ओळखपत्र नोंदणी कार्यालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 31 जण ठार तर पन्नासपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे देशात 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे.या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

हा स्फोट ‘टोलो न्यूज’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार केंद्राच्या प्रवेशद्वारावर घडला. हा एक आत्मघाती हल्ला होता. या स्फोटात तीसपेक्षा जास्त जणांचा बळी गेल्याचे काबूल पोलिसांचे प्रमुख दाऊद अमीन यांनी सांगितले.

हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

या केंद्रावर नागरिकांच्या राष्ट्रीय ओळखपत्रांची नोंदणी करण्यात येते. हल्ल्याचे नव्याने लक्ष्य बनवण्यात आलेले हे केंद्र काबूल शहराच्या पश्चिमेतील शियाबहूल भागात आहे. अफगाणिस्तानामध्ये दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या निवडणुकांसाठी 14 एप्रिलपासून नोंदणी सुरू करण्यात आली होती.

या निवडणुकांमध्ये सुरक्षा व्यवस्था हा चिंतेचा विषय ठरणार असल्याची भीती निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ सौजन्य : अलजजिरा