मृत्यूनंतरही माणसाचे केस आणि नखं वाढत राहतात ? जाणून घ्या सत्य

पोलिसनामा ऑनलाईन – मृत्यूनंतर माणसाच्या नखांची आणि केसांची वाढ होते, आणि जर अशी वाढ होत असेल तर ती किती होते यावर शास्त्रशुद्ध संशोधन उपलब्ध नाही. मात्र, जुन्या गोष्टी, इतिहासात, मृतदेहावरून शिकणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यांचे किस्से, याचे उल्लेख सापडतात. विज्ञान सांगते की, हाताची नखं वाढण्यासाठी नवीन पेशी तयार व्हाव्या लागतात, जे ग्लुकोजशिवाय शक्य नाही. नखं दररोज सरासरी 0.1 मिलीमीटरने वाढतात. वाढत्या वयासोबत नखं वाढण्याचा वेग मंदावतो.

नखांच्या वाढीबाबत विज्ञान काय सांगते
नखाच्या तळाशी असलेल्या ऊतींना जर्मिकल मॅट्रिक्स म्हणतात. नखाच्या वाढीस कारणीभूत पेशी तयार होण्यास त्याचा उपयोग होतो. नवीन पेशी जुन्या पेशींना पुढे ढकलतात. त्यामुळेच नखांची लांबी वाढलेली दिसते. मृत्यूनंतर ग्लुकोजचा पुरवठा बंद झाल्याने नखांची वाढही थांबते.

केसांच्या वाढीबाबत विज्ञान काय सांगते
केसांची वाढ बीजकोशामुळे होते. या बीजकोशाच्या तळाशी पेशी समूह असतो. त्याचे विघटन होऊन नवीन पेशी तयार होतात आणि त्यामुळेच केसांची वाढ होते. ऊर्जेचा पुरवठा सुरू असेपर्यंत हे विघटन वेगाने सुरू असते. ही ऊर्जा ग्लुकोजच्या ज्वलनातून मिळते, यासाठी ऑक्सिजनचे अस्तित्व लागते. हृदयाने रक्ताला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबवला की, ऊर्जेची निर्मिती थांबते. त्यामुळे पेशी समूहाचे कामही थांबते.

त्यामुळे मृत्यूनंतर केस आणि नखं वाढतात या दाव्यांमध्ये तथ्य नाही. परंतु, अनेक काही जैविक कारणांमुळे असे झाल्याचे भासते. नखांभोवतीची त्वचा आक्रसते त्यामुळे नखं मोठी दिसू लागतात. त्यामुळे मृतदेहाची नखं आणि केस वाढणे प्रत्यक्षात शक्य नाही.