Pune Metro साठी परदेशी वित्तीय संस्थांसोबत 1 हजार 350 कोटी रूपयांचा करार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालय व युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्यात तब्बल 1 हजार 350 कोटींच्या वित्तीय करारावर शुक्रवारी (दि. 7) दिल्लीत स्वाक्ष-या झाल्या. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव, के. राजारामन यांनी भारत सरकारतर्फे करारावर सही केली. तर युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेचे उपाध्यक्ष क्रिस्तियन केटल थॉमसन यांनी इआयबीच्या वतीने स्वाक्षरी केली. पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार आणि सहकार्य मंत्री फ्रान्सिस्को आंद्रे आणि इआयबीचे अध्यक्ष वेर्नेर होयेर यांच्या उपस्थितीत हा करार झाला.

पुण्यात सुरु असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेने एकूण 600 दशलक्ष युरोचे कर्ज मंजूर केले आहे. पहिल्या टप्प्यासाठी 200 दशलक्ष युरोंचा वित्तीय करार 2019 मध्ये झाला होता. त्यातून झालेल्या कामाचा आढावा घेऊन बॅंकेने कर्जाचा दुसरा हप्ता मंजूर केला आहे. या कर्जातून आता मेट्रोसाठीच्या कोचची खरेदी केली जाणार आहे. मेट्रो प्रकल्पाचे पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी असे दोन मार्ग यात आहेत. एकूण अंतर 31 किमीचे असून त्यात शिवाजीनगर ते स्वारगेट हे 5 किमीचे अंतर भुयारी आहे. हा संपुर्ण प्रकल्प 11 हजार 500 कोटी रूपयांचा आहे. इआयबी शिवाय अन्य काही परदेशी वित्तीय कंपन्यांकडूनही पुणे मेट्रो प्रकल्पासाठी कर्ज घेतले गेले आहे. महामेट्रो या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे.