ऑगस्टा प्रकरणामुळे लोक राफेल घोटाळा विसरणार नाहीत : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोनिया गांधी यांचे नाव ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मिशेल याने घेतल्याने लोक राफेल घोटाळा विसरणार नाहीत. २०१९च्या निवडणुकीपूर्वी सोनिया गांधी व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे. ख्रिस्तियन मिशेल याने सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्ली न्यायालयात केला होता. मात्र, हे नाव नेमके कोणत्या संदर्भात घेतले ते उघड करण्यास ईडीने नकार दिला होता. यावरून शिवसेनेने भाजपाला फटकारले आहे.

सामनातून भाजपवर टीका करताना शिवसेनेने म्हटले आहे की, ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात दलाली मिळाली आहे व संबंधित आरोपी कितीही मोठे असले तरी त्यांना सोडता कामा नये व काँग्रेसला या प्रकरणाचा जाब द्यावा लागेल. पण ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात मिशेलने सोनिया गांधी व त्यांच्या काँग्रेसचे नाव घेतले म्हणून लोक राफेल विमान घोटाळा विसरतील असे कुणी समजू नये. सोनिया गांधी व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना २०१९ आधी घेरण्याचा हा प्रकार आहे.

महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राममंदिर हे विषय प्रचारातून मागे पडतील व मिशेल महाराजांचेच नामजप होईल असे दिसते. मिशेलने जसे सोनिया गांधींचे नाव घेतल्याचा दावा केला जातो, तसे राफेलप्रकरणी पंतप्रधान मोदी व अनिल अंबानींचे नाव थेट फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी घेतले होते, हा घोटाळा काही हजार कोटींचा आहे व त्यात एका उद्योगपतीचे कल्याण झाले. म्हणजे राफेल विरुद्ध ऑगस्टा वेस्टलॅण्ड अशी ही लढाई आहे. सरकारी यंत्रणा दोनचार लोकांच्या टाचेखाली आहे व राजकीय विरोधकांना विविध प्रकरणांत गुंतवण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे, असे शिवसेनेने सामनातील अग्रलेखात म्हटले आहे.