अजय देवगनच्या ‘तानाजी’ चित्रपटाचं नाव बदलणार 

मुंबई : वृत्तसंस्था – ‘अहत्तंजावर तहत्पेशावर सारा मुलूक आपला’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाक्याने प्रेरीत झालेले मावळे इतिहासाच्या पानावर दिव्य पराक्रम नोंदवून गेले. अशाच मावळ्यांपैकी एक मावळा म्हणजे बुरुजासारखी भारदस्त छाती असणारा तानाजी मालुसरे. आणि याच तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाच्या कथा अभिनेता अजय देवगण चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. सध्या अजय देवगण याच चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. परंतु आता या चित्रपटाचं नाव बदलणार आहे अशी माहिती समजत आहे.  ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ असं या चित्रपटाचं नाव असून त्यात बदल होऊन म्हणजेच ‘तानाजी’ हे नाव बदलून ‘तान्हाजी’ असं ठेवण्यात येणार असल्याचं कळतं आहे.
अजयच्या या  या चित्रपटाचं शीर्षक बदलण्यामागे ज्योतीषीचे कारण सांगितलं जात आहे अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान अजयने मात्र कोणीतीही माहिती दिलेली नाही असं दिसत आहे. पंरतु चित्रपट पटकथालेखनाच्या टीमने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. आजवर विविध कारणांमुळे बऱ्याच चित्रपटांची नावं बदलण्यात आल्याचं आपण पाहिलं आहे.
या चित्रपटाचं  बजेट  १५० कोटी रुपयांचं आहे. दरम्यान ओम राऊत या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.  ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या घोषणेपासूनच यातील कलाकारांविषयी उत्सुकता निर्माण झाली.  सलमान खान शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा असून  शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. अजय यामध्ये तानाजींची व्यक्तिरेखा साकारत आहे.  मराठी अभिनेता अजिंक्य देव या चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ही कोणती भूमिका असणार याबाबत अद्याप काही स्पष्ट झालं नाही. दरम्यान  काही दिवसांपूर्वीच अजयने ‘तानाजी’चा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता.
सिंहगडाच्या संग्रामामध्ये तानाजी मालुसरे यांचं योगदान मोलाचं आहे.  कोंढाण्याच्या लढण्यासाठी त्यांनी कुटुंबावर अक्षरश:  तुळशीपत्र ठेवलं होतं. आता सर्व गोष्टी  चित्रपटाच्या रुपानं पुन्हा एकदा सर्वांसमोर येणार आहे. दरम्यान ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराज आणि त्यांच्या निर्भीड मावळ्यांच्या पराक्रमांच्या गाथा जिवंत केल्या जाणार आहेत.