राज्यातील 13 विद्यापीठांच्या परीक्षा ‘ऑनलाईन’च; उदय सामंत यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. आत्तापर्यंत अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता राज्यातील 13 विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षांच्या नियोजनांमध्ये बदल करण्यात आला आहे. काही परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात की ऑफलाईन यावरच चर्चा सुरु होत्या. त्यानंतर राज्य सरकारने महाराष्ट्रातील 13 अकृषी विद्यापीठांच्या उर्वरित सर्व परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच घेतल्या जातील, असे जाहीर केले आहे. तसेच विद्यापीठांना आवश्यक त्या सोयी-सुविधा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून पुरवल्या जातील. मात्र, कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, याची जबाबादारी विद्यापीठांच्या कुलगुरूंची असेल. या सर्व विद्यापीठांना दोन दिवसांत या संबंधीच्या आदेशाचे पत्रक मिळेल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. अशा परिस्थितीत नियोजित वेळापत्रकानुसार जर विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जावे लागणार असेल तर त्यांना लॉकडाऊनच्या निकषांतून सूट द्यावी लागेल. त्यामुळे आता राज्यातील 13 विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा महत्वपूर्ण घेतला आहे.