Latur News : बर्ड फ्लूचे संकट ? लातूरमध्ये 350 कोंबडयांचा मृत्यू, पुण्याच्या प्रयोगशाळेस वैद्यकीय नमुने पाठवले, कारण अद्याप अस्पष्ट

अहमदपूर (जि. लातूर) : पोलीसनामा ऑनलाईन –   देशात मध्य प्रदेश, हरियाणा आदी राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव सुरु असताना लातूर जिल्ह्यातील केंद्रवाडी (ता. अहमदपूर) गावात सुमारे 350 कोंबड्या शनिवारी (दि. 9) सकाळी अचानक दगावल्या. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अचानकपणे कोंबड्या मरण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. कोंबड्यांना न्यूमोनिया झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पशुवैद्यकीय पथकाने पाहणी करून मृत कोंबड्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.

येथील सदाशिव केंद्रे यांनी दोन महिन्यांपूर्वी अहमदनगर येथून 800 गावरान कोंबड्यांचे पक्षी आणून त्याचे संगोपण करत होते. दरम्यान, शनिवारी सकाळी अचानक त्यातील 350 कोंबड्या दगावल्या. कोंबड्या दगावल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर लातूर येथील पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश कोकणे आदीनी भेट देऊन पाहणी केली. काही पक्ष्यांचे नमुने घेऊन पुण्यातील विषाणू संशोधन प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. दरम्यान इतर पक्ष्यांना बाधा होऊ नये म्हणून प्रतिजैविके दिली जाणार आहेत, तसेच शेतकऱ्याने पीपीई किट व मास्कचा वापर करावा, अशा सूचना पशुसंवर्धन विभागाने केल्या आहेत.

कमी जागेत अधिक कोंबड्या आहेत. नेमके कोणत्या कारणामुळे कोंबड्या दगावल्या, हे आताच सांगता येणार नाही. काही नमुने घेऊन पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच कारण स्पष्ट होईल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले यांनी सांगितले.

मृत कोंबड्यांना गाडले अन् परिसर केला सील

मयत कोंबड्यांना संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जमिनीत गाडण्यात आले, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील केला आहे. आजारी व सशक्त कोंबड्यांचे विलगीकरण केले आहे. त्यांना प्रतिजैविके व औषधोपचार करण्यात आला आहे.