बिटकॉइनच्या माध्यमातून करोडोंचा गंडा घालणारा अमित भारद्वाजला बँकॉकला अटक

क्रिप्टो करन्सीमधील मुख्य आरोपी अमित भारद्वाजला बँकॉकमधून बुधवारी केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केल्याची माहिती विश्वनीय सूत्रांनी दिली.

कोण आहे अमित भारद्वाज?
गुंतवणूकधारकांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून बिटकॉइनच्या माध्यमातून करोडोंचा गंडा घालणारा गेन बिटकॉइन संकेतस्थळाचा संस्थापक व स्वयंघोषित क्रिप्टो गुरु अमित भारद्वाजला पुणे पोलिसांच्या विशेष प्रयत्नातून केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या सहकार्याने थायलंड मधील बँकॉक येथे अटक करण्यात आली. त्याला पुढील तपासासाठी पुण्यात आणण्यात येत आहे. भारतात उघडकीस आलेला हा मोठा बिटकॉइन घोटाळा असून त्याने हजारो लोकांची फसवणूक केली आहे. पुणे पोलीसांनी बुधवारी बिटकॉइन फसवणूकीचा गुन्हा नोंदवून त्यासंदर्भातली माहिती पत्रकार परिषदेत दिलेली असताना आज झालेली अमित भारद्वाजची अटक हे पुणे पोलिसांचे व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचे महत्वाचे यश मानले जात आहे.

गेनबिटकॉइन आणि जीबीमाईनर्स या दोन कंपन्यांच्या माध्यमातून अमित भारद्वाज भारतातील वेगवेगळ्या शहरात गुंतवणूकदारांना आपल्या आकर्षक सेमिनार्सच्या माध्यमातून मोठ्या परताव्याची हमी देऊन आपल्या कंपनीत बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत असे. त्यासाठी त्याने वेगवेगळ्या एजंटची नेमणूक करून त्यांच्याकडून बिल्डर्स, व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापारी अशा लोकांना आपलया जाळ्यात ओढले. लोकांनीही त्यावर विश्वास ठेवून मोठ्या परताव्याची आशा बाळगून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. पण प्रत्यक्षात अमित व त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांना बिटकॉइन न देता आपल्याच कंपनीत तयार केलेली व्हर्चुअल करन्सी एमकॅप देण्यास सुरुवात केली. आज जिथे एका बिटकॉइनची किंमत जवळपास ५ लाख असताना एका एमकॅपची किंमत फक्त १३ रु.आहे. म्हणजेच बिटकॉइनचे अमिष दाखवून त्याने स्वतःचीच करन्सी तयार करून गुंतवणूकदारांची फसवणूक केली. अशाच प्रकारे त्याने महाराष्टातील मुंबई, पुणे, नांदेड, कोल्हापूर अशा विविध शहरात आपले सावज गाठून लोंकाना फसविले आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार त्याने साधारण आठ हजारपेक्षा जास्त लोकांना अशाच प्रकारे चुना लावला आहे. प्रत्यक्षात हा आकडा आणखी वाढण्याचीच शक्यता आहे. या ठगाने अशा प्रकारे लुबाडलेली रक्कम करोडोंच्या घरात असून प्रत्यक्ष हा महाभागच आपल्या करामतीचा पाढा पोलिसांसमोर वाचेल तेव्हाच खरी या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येईल.

हार्टअटॅकच्या बहाण्याने दुबईतून पलायन
बिटकॉइनच्या माध्यमातून होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारने अशा कंपन्यांवर लक्ष ठेवणे चालू केल्याचा सुगावा लागल्याने अमित भारद्वाज दुबईला पळाला होता. जानेवारीत त्याच्या संदर्भतील काही तक्रारी येत होत्या पण कारवाईच्या भीतीने गुंतवणूकदार तक्रार करण्यास पुढे येण्यास धजावत नव्हते. पुणे पोलिसांनी अशा स्वरूपाची प्राथमिक तक्रार मिळताच गुंतवणूकदारांना विश्वासात घेऊन सायबर तज्ज्ञ पंकज घोडे व सहकारी यांच्या मदतीने योग्यती माहिती जमवून कायदेशीर कारवाईला सुरुवात केली. त्यातूनच अनेक चक्रावून टाकणारी माहिती समोर येत गेली व या गुन्हाची व्याप्ती आतंरराट्रीय असल्याची खात्री झाली. अमित भारद्वाज दुबईला पळल्याचा सुगावा पोलिसांना लागताच केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून दुबईतच त्याचा मुसक्या आवळण्याचा प्रयन्त चालू होता पण मार्चमध्ये भारद्वाज दुबईतून आपल्याला हार्ट अटॅक आल्याचा बहाणा करून नाट्यमयरित्या बँकॉकला पळाला.

भारद्वाजच्याभोवती संशयाचे भूत
अमित भारद्वाजने केलेल्या या घोटाळ्याचा सूत्रधार जरी अमित असला तरी याची व्याप्ती अतिशय मोठी असून वृत्तसंस्थांच्या मते ती १००० कोटीच्या पुढे आहे. तसेच त्याचे पाकिस्तानस्थित आयएसआयशी संबंध असल्याच्या संशय आहे. भारद्वाजने आपला पासपोर्ट त्याच्याच एका साथीदाराकडून सेंट्रल अफ्रीकन रिपब्लिक मधून घेतल्याचाही संशय आहे. पुढे तपासात बरीचशी माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

महत्वाचे : दत्तवाडी पोलीस ठाण्यात बिटकॉईन संदर्भात गुन्हा दाखल झाला त्यामध्ये काही आरोपीला अटक देखील झाली. मात्र, मुख्य सूत्रधार मोकाट होता. बिटकॉईन प्रकरणाची व्याप्ती आणि प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांशी समन्वय साधून पुणे सायबर गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश दिले. अखेर मुख्य सुत्रधार अमितला अटक झाली. त्याच्या अटकेत पुणे पोलीस आणि पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा मोठा वाटा आहे.

संबंधित घडामोडी:

क्रिप्टो करन्सीतील मुख्य आरोपीला बँकॉकमधून अटक