2 मुलींसह महिलेला रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवणं पडलं महागात, पोलिसांना द्यावा लागला 1 लाख रूपयांचा दंड

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन –  सूर्यास्तानंतर महिलांना पोलीस ठाण्यात बोलावू नये किंवा बसवून ठेवू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही तत्कालीन अमरावती पोलीस आयुक्त (Amravati commissioner of police) व विद्यमान नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी रात्रीपर्यंत महिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात (Police Station) बोलावल्याने राज्य मानवाधिकार आयोगाने पोलीस विभागाला एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. हा पोलीस विभागाला मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

हा प्रकार 17 मार्च व 21 मार्च 2011 मधील आहे. पोलिसांनी एका गुन्ह्यात कांचनमाला गावंडे यांच्या पतीला अटक केली होती. अटक केल्यानंतर अमरावती पोलिसांनी कांचनमाला गावंडे व त्यांच्या दोन मुलींना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. कांचनमाला आणि त्यांच्या दोन मुलींना रात्री नऊ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. तसेच त्यांना धमकावले. त्यावेळी त्याठिकाणी महिला अधिकारी किंवा महिला कर्मचारी उपस्थित नव्हते. याप्रकरणी कांचनमाला गावंडे यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली.

कांचनमाला यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या विरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली. या प्रकरणात मानवाधिकार आयोगाने पोलिसांना दोषी मानून एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड कांचनमाला आणि त्यांच्या दोन मुलींना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश मानवाधिकार आयोगाने राज्याचे पोलीस विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिले आहेत.

राज्याचे पोलीस महासंचालक यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्याची सूचना देण्यात आली असून कांचनामाला गावंडे यांना अमरावती पोलीस आयुक्तालयाकडून एक लाखाचा धनादेश देण्यात आला आहे.