लक्ष्मीबाईंनी माझ्यासारखा ‘पँथर’ घडवला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या जीवनात आईचे स्थान मोलाचे आहे. आपण कायम तिच्याप्रती कृतज्ञ असले पाहिजे. लक्ष्मीबाई वाडेकर यांच्या परशुरामसारखे हजारो कार्यकर्ते माझ्या पाठीशी असल्यानेच माझ्यासारखा ‘पँथर’ घडला. संघर्षमय जीवन जगत लक्ष्मीबाई यांनी परशुराम वाडेकर यांच्यासह इतर मुलांना वाढवले, मोठे केले. त्यांच्या जगण्यातून संघर्षाशी दोन हात करण्याची आणि कुटुंबाला घडविण्याची प्रेरणा अनेक मातांना मिळेल. त्यांच्यासारखी आई प्रत्येकाला मिळावी. लक्ष्मीबाईनी आनंदात वयाची शंभरी पूर्ण करावी, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई बाळकृष्ण वाडेकर यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराचे. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कौटुंबिक सोहळ्यात लक्ष्मीबाई यांची ग्रंथतुलाही करण्यात आली. तसेच त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त संघर्षातून आयुष्य घडवलेल्या विजयाबाई सोनकांबळे, सावित्रीबाई म्हस्के, नजमा काझी, अलका खरे व तृप्ता द्विवेदी या मातांचाही सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे, अल्पसंख्याक आघाडीचे अॅड. आयुब शेख, शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेविका सुनीता वाडेकर, महिला आघाडीच्या चंद्रकांता सोनकांबळे, संगीता आठवले, युवक अध्यक्ष शैलेश चव्हाण, गायक आनंद शिंदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी लक्ष्मीबाई वाडेकर यांचे अभिष्टचिंतन करीत उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

परशुराम वाडेकर म्हणाले, “माझ्या जडणघडणीत आईचा वाटा खूप मोठा आहे. तिने दिलेल्या संस्कारांमुळेच आंबेडकरी, दलित आणि पँथर चळवळीत वाढलो. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, या भावनेतून हा सत्कार सोहळा आयोजिला आहे. गेल्या वर्षीच हा सोहळा करण्याचा मानस होता. परंतु, भीमा कोरेगावच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तो यंदा करत आहे. प्रत्येकाने आपल्या आईला आदराचे स्थान दिले पाहिजे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. लक्ष्मीबाई वाडेकर यांनीही आपल्या भावना व्यक्त करीत उपस्थितांना शुभाशीर्वाद दिले. प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई यांनीही शुभचिंतन केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.