प्रवीण दरेकरांचे शरद पवारांना पत्र, म्हणाले – ‘आपल्या सूचना…’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानपरिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वर्षभराचा लेखाजोखा या पुस्तकाचे आज प्रकाशन होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये काही दिवसापूर्वी एका मुद्द्यावरून शरद पवारांनी प्रवीण दरेकर यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्या टीकेलाच दरेकरांनी उत्तर दिले आहे. आपल्या सूचना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी नेहमीच नवऊर्जा ठरतात, असंही दरेकर यांनी या पत्रात म्हंटले आहे. ‘हे पुस्तक नजरेखालून घातल्यानंतर “आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होतो, याबद्दल आपणास कधीही वाईट वाटणार नाही किंवा या पदाचं अवमुल्यन झाल्याचं शल्यही आपल्याला राहणार नाही. या बद्दल मला विश्वास आहे. पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर सर्वप्रथम शरद पवार यांच्या अवलोकनार्थ एक प्रत सुपुर्द करणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

काय म्हंटल आहे दरेकरांनी शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात
आपण देशाचे, राज्याचे एक आदरणीय नेते आहात परंतु, मी यासाठी व्यथित झालो की, त्या प्रकरणाची एकच बाजू आपल्यासमोर आल्यामुळे आपल्यासारख्या वरिष्ठ नेतृत्वाला वाईट वाटलं आणि पदाचं अवमूल्यन झाल्याची भावना आपल्यात निर्माण झाली. परंतु, मी महिला शेतकऱ्यांबाबत मांडलेला मुद्दा हा प्रत्यक्षदर्शी त्या महिलांशी बोलल्यानंतर व्यक्त केला होता त्यात कोणताही राजकीय अभिनिवेश नव्हता, उलटपक्षी विरोधी पक्षनेता पदाच्या कर्तव्य भावनेने या गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा केलेला एक विनम्र प्रयत्न होता.

“वर्षपूर्तीचा लेखाजोखा या पुस्तकाच्या निमित्ताने हा संवाद मी पत्ररुपाने आपल्याशी अत्यंत विनम्रतेने साधत आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर माझ्या पक्षाने १६ डिसेंबर २०१९ ला विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवली. विरोधी पक्ष नेता म्हणून गेल्या वर्षभरात केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा सादर करणं, हे मी माझं कर्तव्य समजतो आणि याच कर्तव्य भावनेने मी हा लेखाजोखा तयार केलेला आहे.

ज्यावेळी मी या पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी सन १९६० पासून विधान परिषदेला विरोधी पक्ष नेत्यांची थोर परंपरा आहे, याची मला जाणीव होती आणि ही जाणीव सतत जागरुक ठेऊनच मी वर्षभरात विरोधी पक्ष नेता म्हणून कामकाज सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहे.

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण देश आणि महाराष्ट्र कोरोना महामारीशी झुंज देत होता. विरोधी पक्षात असलो, विरोधी पक्ष नेता असलो तरी कोरोना महामारीशी महाराष्ट्र लढत असताना सरकारच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण सहकार्य करण्याचं अभिवचन आम्ही सरकारला दिलं. एक जबाबदार विरोधी पक्ष नेता या नात्यानं कोरोना काळात सर्व काळजी घेऊन घराच्या बाहेर पडलो आणि अनेक क्वारंटाईन सेंटर्स, कोविड सेंटर्स, जंम्बो कोविड सेंटर्स, विविध रुग्णालयं यांना भेटी देऊन तेथील उपाययोजनातील त्रुटी, रुग्णांच्या व्यथा आणि करावयाचे बदल, याविषयी जाणून घेतलं, त्या त्या महापालिका आयुक्तांबरोबर चर्चा केली आणि उपाययोजनातील त्रृटी कधी मंत्री महोदयांशी प्रत्यक्ष संपर्क साधून तर कधी ११० पत्रं लिहून सरकारच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला.

सन २०२० च्या जून महिन्यात कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. एका रात्रीत संपुर्ण कोकण उध्दस्त झाला. त्यावेळी कोरोनाची साथही होती आणि प्रचंड वेगाने वारे वाहत असताना कशाचीही पर्वा न करता मी त्याच संध्याकाळी कोकणात जाण्याचा निर्णय घेतला आणि दोन दिवस कोकणवासियांमध्ये राहीलो, नुकसानीची पाहणी केली आणि प्रत्यक्ष बघितलेली वस्तुस्थिती सरकारच्या निदर्शनास आणून देऊन नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
मागच्या वर्षी जून ते ऑक्टोबर या काळात महाराष्ट्राच्या विविध भागात, विशेषत: विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण या भागात मोठया प्रमाणावर अतिवृष्टी झाली व त्यामुळे लाखो शेतकरी संकटात सापडले होते. त्यावेळी मी राज्यातील जवळ जवळ सर्व अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला, शेतकऱ्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानीचे पंचनामे असतील, पीक विम्याचे अर्ज असतील, तातडीची मदत असेल, नुकसानीचे पॅकेज असेल, याबाबतीत सरकारला जाग आणण्याचं काम केलं.

कोरोना काळात उपाययोजनांच्या नावाखाली अंमलबजावणी यंत्रणेतील काही अपप्रवृत्ती गैरप्रकार करत असल्याचं लक्षात आलं. त्यावेळी असे प्रत्येक गैरप्रकार विरोधी पक्षनेता या नात्याने मी सभागृहात व सभागृहाबाहेर उघड केले आणि सरकारला जाब विचारला. कोरोना काळात शासकीय आरोग्य व्यवस्था अपुरी ठरली आणि कोरोनाग्रस्त रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. परंतु, खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची लुट होत असल्याच्या काही घटना माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी मुंबईतील लाईफलाईन आणि कोहिनूर हॉस्पिटलला अचानक भेट देऊन त्यांनी आकारलेल्या लाखो रुपयांच्या अवाजवी बिलांचा भांडाफोड केला आणि ही बाब सरकारच्याही निदर्शनास आणून दिली. मी असा दावा करणार नाही की, यामुळेच नंतरच्या काळात खाजगी रुग्णालयांना चाप बसला, परंतु या प्रयत्नांमुळे हे गैरप्रकार थांबविण्याला सुरुवात झाली, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही.

गेल्या वर्षभराच्या काळात महिलांवरील अत्याचाराने क्रुरतेची परिसिमा गाठली. मी शक्यतो घटनास्थळी जावून अत्याचारग्रस्त महिलेला, त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देण्याचा आणि पोलीस दलावर, सरकारवर अशा गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर होण्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून दबाव निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

सभागृहातील कामकाजाबाबत मी अधिक भाष्य करणार नाही, कारण, या पुस्तकात या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. परंतु, एक विनम्रपणे नमूद करु इच्छितो की, विरोधी पक्ष नेता म्हणून शासकीय कामकाज सभागृहात पार पाडण्यासाठी कधी अवाजवी अडथळा निर्माण केला नाही.

विरोधी पक्ष नेता म्हणून मी सरकारवर जरुर टीका केली, पण व्यक्तीगत आणि मानहानीकारक टीकेला कधी थारा दिला नाही. टीका करत असताना किंवा सरकारला काही सूचना करत असताना नेहमी मी दोन्ही बाजू तपासून बघण्याचा, आवश्यक त्या ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरच सरकारला बोल लावले, असंही नम्रपणे नमूद करु इच्छितो.

मी एक लहान कार्यकर्ता आहे. राज्यातील एक आदरणीय व जेष्ठ नेते म्हणून आपल्याकडे पक्षनिरपेक्षपणे पाहिले जाते आणि माझ्याही आपल्याबद्दल याच भावना आहेत. हा लेखाजोखा सादर करण्यामागे किंवा या पत्रद्वारा आपल्याशी संवाद साधण्यामागे स्वस्तुतीचा भाग गौण आहे, त्यापेक्षा विरोधी पक्षनेता म्हणून मी बजावलेले माझे निहित कर्तव्य आणि या पदाचा सन्मान वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत विनम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देण्याचा हा एक यथार्थ प्रयत्न आहे.

आजपर्यंतच्या विधान परिषदेच्या मा.विरोध पक्षनेत्यांनी त्यांचे वार्षिक कार्यअहवाल जनतेपुढे ठेवले किंवा नाही, याची मला कल्पना नाही. परंतु पक्षाने, पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीचे निर्वहन जनतेसाठी कसे केले , याची माहिती अहवालरुपाने देण्याचा उद्देश “वर्षभराचा लेखाजोखा” हे पुस्तक प्रकाशित करण्यामागे आहे, ज्याचे प्रकाशन दि. 28 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.” अशी या पत्रात म्हंटल आहे. दरम्यान, दरेकरांनी लिहिलेल्या या भावनिक पत्रामुळे राजकीय क्षेत्रातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.