आणि मोदींनी मागितली विद्यार्थ्यांची माफी

कोलकाता : वृत्तसंस्था

शांतिनिकेतनमधील विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची चक्क माफी मागितली. मोदी यांनी बंगाली भाषेत भाषणाची सुरुवात केली. त्यावेळी ते म्हणाले, मी येथे येत असताना काही विद्यार्थ्यांनी येथे पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे मला सांगितले. याबद्दल मी आपली क्षमा मागतो.

शांतीनिकेतनमध्ये झालेल्या या दीक्षांत समारंभाला दोन देशांचे पंतप्रधान उपस्थित होते. बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसीनाही या समारंभाला आल्या होत्या. मोदी म्हणाले, एका विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला दोन देशांचे पंतप्रधान उपस्थित आहेत, असे बहुदा पहिल्यांदाच घडत असेल. भारत आणि बांगला देश एकमेकांकडून खूप काही शिकू शकतात.

पंतप्रधान मोदींनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘मी याठिकाणी एक पाहुणा म्हणून नव्हे, तर विद्यार्थी म्हणून आलोय. गुरुंकडे गेल्याशिवाय विद्या मिळत नाही, अशी आपली संस्कृती सांगते. रविंद्रनाथ टागोर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर इतक्या प्राध्यापकांच्या उपस्थितीत वेळ घालवण्याची संधी मला मिळतेय, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो,’असं मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी रविंद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधींचा विशेष उल्लेख केला. ‘इथल्या जमिनीला गुरुदेवांच्या पायांचा स्पर्श लाभलाय. केव्हा तरी त्यांनी याच ठिकाणी त्यांनी महात्मा गांधींसोबत चर्चा केली असेल, असा विचार मी जेव्हा गाडीतून उतरलो, तेव्हा माझ्या मनात येऊन गेला,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी टागोर आणि महात्मा गांधींच्या स्मृतींना उजाळा दिला.