अन् राजकीय पुढार्‍यांना केली गावबंदी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – तब्बल 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही गावातील शेताच्या सिंचनासाठी निळवंडे धरणाचे पाणी आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गावात जोपर्यंत धरणाचे पाणी येत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याला प्रवेश द्यायचा नाही, असा ठरावच संगमनेर तालुक्यातील कासारे गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला आहे.

निळवंडे धरण होऊन अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, धरणाच्या कालव्याचे काम अजूनही रखडलेले असल्याने या कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून लाभधारक शेतकऱ्यां​​ना पाणी मिळावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अकोले तालुक्यातील शेतकरी इतक्या वर्षांनंतर सुरू झालेल्या कालव्याच्या कामास विरोध करीत आहेत. पाण्यासाठी आता संगमनेर तालुक्यातील कासारे गावातील शेतकऱ्यांनी अधिकच आक्रमक झाले आहेत. प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी राजकीय पुढाऱ्यांना गावात थेट प्रवेशबंदी करण्याचा ठराव घेतला.

गेल्या 40 वर्षात निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांसाठी अनेकांनी राजकारण करत मंत्रीपद भूषवले. मात्र, निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम मार्गी लागले आहे. आता कालव्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. या कामाला काही राजकीय लोक आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी विरोध करत आहे. तर काही लोक समर्थन करत आहेत. यामुळेच आता निळवंडे लाभधारक क्षेत्रातील कासारे या गावातील शेतकऱ्यांनी आता ठाम भूमिका घेतली आहे.

…पण पाणी मिळणार का?

कासारे गावातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनासाठी पाणी निळवंडे धरणातून येत नाही, तोपर्यंत गावात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला प्रवेश दिला जाणार नसल्याचा ठराव ग्रामसभेत केला आहे. ४० वर्षांपासून आपल्या हक्काच्या पाण्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना आता पाणी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.