धक्कादायक ! मुख्याध्यापक जोडप्याने आपल्याच मुलींची केली हत्या, म्हणाले – ‘सोमवारपासून सतयुग आहे, पुन्हा जीवित होणार !’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेल्या पालकांनीच त्यांच्या दोन तरुण मुलींचा जीव घेतला. ही घटना चित्तूर जिल्ह्यातील मदनपल्ले शहरात घडली. आश्चर्य म्हणजे दोन्ही आरोपी पालक उच्च सुशिक्षित आहेत. अलेख्या (27 वर्षे) आणि साई दिव्या ( 22) अशी या मुलींची नावे आहेत. हे कुटुंब मदनपल्ले येथे शिवालयम टेम्पल स्ट्रीटवर राहत होते. असा आरोप केला जात आहे की, आईने दोन्ही मुलींवर डंबेलने हल्ला केला.

आई पद्मजा आणि वडील पुरुषोत्तम नायडू दोघेही प्राचार्य आहेत. मोठी मुलगी अखेल्याने भोपाळ येथून पदव्युत्तर पदवी घेतली होती. लहान मुली साई दिव्याने बीबीए केले होते. साई दिव्या मुंबईतील एआर रहमान म्युझिक स्कूलची विद्यार्थिनी होती आणि लॉकडाऊन दरम्यान घरी परतली होती. कोविड – 19 लॉकडाऊन दरम्यान हे कुटुंब विचित्र वागणूक देत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रविवारी रात्री या घरून ओरडण्याचा आवाज शेजार्‍यांनी ऐकला आणि पोलिसांना कळविला.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलिस घराच्या आत जात असताना, आरोपी दाम्पत्याने थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा पोलिस आत गेले तेव्हा त्यांना तेथील परिस्थिती पाहून आश्चर्य वाटले. पूजा कक्षात एका मुलीचा मृतदेह आढळला. दुसर्‍या खोलीतून दुसर्‍या मुलीचा मृतदेह सापडला. दोन्ही मृतदेह लाल कपड्याने झाकलेले होते. हा गुन्हा करूनही आरोपी पती-पत्नी दोघेही कोणत्याही तणावात दिसत नव्हते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, ‘कलयुग’ संपत आले आहे आणि सतयुग सोमवारपासून सुरू होणार आहे. सूर्योदयासोबत दोन्ही मुली जिवंत होतील. पोलिसांनी पती-पत्नीला ताब्यात घेतले आणि दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविले आहे.