‘महाराष्ट्रात मृत्यूचे तांडव सुरु असतांनाही असले दळभद्री वक्तव्ये सरकारची राज्याप्रती जाणीव दर्शवतात’; आरोपाचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने उद्भवलेल्या बिकट परिस्थितीवरून ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिकांनी खळबळजनक दावा करत केंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या 16 कंपन्यांना राज्य सरकारने विचारले असता त्यानी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषध पुुरवू नका, असे सांगितल्याचा खळबळजनक दावा केला आहे. जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषध पुरवली तर त्यांचा परवाना रद्द करण्याची धमकी केंद्राने कंपन्यांना दिल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. यावरून भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र शब्दात ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यात मृत्युचे तांडव सुरू असताना असले दळभद्री वक्तव्ये सरकारची राज्याप्रती जाणीव दर्शवतात, अशा शब्दात बावनकुळे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अकार्यक्षम महाराष्ट्र सरकारचे बेजबाबदार मंत्री नवाब मलिक यांच्या दांभिक आरोपाचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे. अन्यथा जनतेची दिशाभूल करणाऱ्या मलिकांना पायउतार करावे. महाराष्ट्रात मृत्युचे तांडव सुरू असतांनाही असले दळभद्री वक्तव्ये सरकारची राज्याप्रती जाणीव दर्शवतात अशा शब्दात बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन मलिक यांना पुरावे देण्याचे आव्हान दिले आहे. मलिकांनी जे आरोप केलेत ते पूर्णपणे निराधार आहेत. जर नवाब मलिकांकडे पुरावे असतील तर आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी. सध्या ठाकरे सरकारने दोषारोप करणे थांबवावे आणि कठिण काळात स्वत:चं काम कराव, असा सल्लाही उपाध्ये यांनी दिला आहे.