मोठी बातमी : अण्णा हजारेंकडून शरद पवारांना ‘क्लीन चीट’, अण्णा म्हणाले….

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिखर बँक घोटाळ्यात ईडीने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर अनेकांनी त्यांची पाठराखण केली. आता यामध्ये अण्णा हजारे यांनी उडी घेतली आहे. राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आपल्याकडे जे पुरावे आले आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव नाही. त्यांचा संबंध नसेल तर त्यांचे नाव कसे पुढे आले, याची चौकशी झाली पाहिजे, असे सांगत अण्णा हजारे यांनी शरद पवारांना क्लिन चीट दिली आहे.

अण्णा हजारे यांनी आज राळेगणसिद्धी येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शरद पवारांचे नाव कसं आनं मला माहीत नाही. याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे. दौषींवर कारवाई व्हावी. जे दोषी नाहीत, त्यांना विनाकारण यामध्ये अडकवू नये. मी दिलेल्या पुराव्यात शरद पवार यांचे नाव नाही. परंतु पुरावे देऊनही अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असे सांगत पवारांचे नाव माझ्याकडे नाही हे सत्य आहे. असे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जे सत्य आहे ते सत्यच आहे आणि खोटे आरोप करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

माझ्याकडे असलेल्या पुराव्यांमध्ये शरद पवार यांचे नाव नाही. मात्र, अजित पवार यांचे नाव आहे. ईडीने शरद पवारांचे नाव कसे घेतले हे चौकशीत पुढे येईल. सहकारी बँकेकडून कारखाण्यासाठी करोडो रुपयांची कर्ज घेतली. मात्र, त्यानंतर कारखान्यांनी ते पैसे परत केले नाही. त्यामुळे बँकांनी कारखान्यांवर जप्तीची कारवाई आणली आणि ते कारखाने कवडमोलाने विकले. यामध्ये आपल्याला शंका असून हे कारखाने आजारी पडले की पाडले असा प्रश्न अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे.