अण्णांचे आजपासून राळेगणसिद्धीत उपोषण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेले आंदोलन आज पासून सुरू होणार आहे अण्णा आज राळेगणसिद्धीत उपोषणाला बसणार आहेत.

उपोषणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना अण्णा म्हणाले की, उपोषण कोणतीही व्यक्ती, पक्षाविरुद्ध नाही. समाज आणि देशाच्या भल्यासाठी सातत्याने आंदोलन करत आलोय. आजचे आंदोलनही लोकांच्या हितासाठी करणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने सरकारचे मी अभिनंदन करतो. कायदा तर विधानसभेत बनतो. त्यामुळे विधासभेत हा प्रस्ताव मंजूर होऊनच कायदा बनने गरजेचे आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेणार नाही, ही माझी ठाम भूमिका असल्याचेही अण्णा म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती. मंगळवारी राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने आता मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत येणार अाहे. त्यामुळे सदर कायद्याची अंमलबजावणी झाल्यास लोकायुक्तांना मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्याचे अधिकार प्राप्त होणार आहेत.