अमेरिकेत आणखी एका भारतीयाची गोळ्या झाडून हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अमेरिकेतील अटलांटामध्ये आणखी एका भारतीय नागरिकाची हत्या करण्यात आली आहे. हरिकृष्णा उर्फ हरीश मिस्त्री (वय-48) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका आफ्रिकी अमेरिकेन व्यक्तीने शनिवारी 3 गोळ्या झाडून हत्या केली. गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हरीश हे मुळचे गुजरातमधील वडोदरा येथील राहणारे आहेत. जेव्हा घटना घडली तेव्हा हरीश त्यांच्या दुकानावर काम करत होते. आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ज्या हल्लेखोराने हरीश यांच्यावर गोळी झाडली तो अगोदर हरीश यांच्या दुकानावरच काम करत होता. मात्र व्यवहार चांगला नसल्यामुळे त्याला हरीश यांनी कामावरुन काढून टाकले होते. रविवारी सकाळी हरीश यांच्या हत्येची माहिती मिळाल्याचे नातेवाईकांनी सांगितलं आहे. हरिश हे 15 वर्षापूर्वी अमेरिकेला गेले होते. अमेरिकेत त्यांचं गॅश स्टेशन स्टोर आहे. त्यांच्या परिवारात एक पत्नी, 19 वर्षाची मुलगी आणि चार वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या दोन बहिणी देखील अमेरिकेत वास्तव्यास आहेत.