#MeToo : अनू मलिक यांच्यावरचे आरोप थांबता थांबेना … 

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन   – देशातील विविध क्षेत्रांतील महिलांनी पुढे येऊन गेल्या काही दिवसांत ‘मी-टू’ चळवळीच्या माध्यमातून आपल्याबाबतीत घडलेले लैंगिक शोषणाचे अनुभव शेअर करून आणि अनेक नामवंत व्यक्तींची शोषणकर्ते म्हणून नावे घेऊन मोठीच खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात रोज नवीन नवीन खुलासे उघडकीस येत आहेत. आता तर एकाच व्यक्तीने अनेकींसोबत गैरवर्तन केल्याचीही प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.
प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आता आणखी दोन महिलांनी संगीतकार- गायक अनू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.
अनू मलिकने स्टुडिओमध्ये असभ्य वर्तन केल्याचा आरोप  एका महिलेने केला आहे. याआधीही मोठ्या गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी किस मागितल्याचा आरोप श्वेता पंडितने केला होता.
१९९० मध्ये मेहबूब स्टुडिओमध्ये अनू मलिक यांना भेटायला गेले असता त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. ही महिला जेव्हा निधी गोळा करण्याच्या कामानिमित्त अनु मलिक यांच्या घरी गेली होती  तेव्हा तिला हा धक्कादायक अनुभव आल्याचं तिने सांगितलं.
‘एका मुलाखतीत पीडित महिलेने सर्व हकीकत सांगितली.तिने दिलेल्या माहितीनुसार  ‘त्यांच्या घरी गेले असता सोफ्यावर ते माझ्या बाजूला येऊन बसले. त्यावेळी त्यांच्या घरी कोणीच नव्हतं. माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत त्यांनी माझा स्कर्ट वर केला. त्यांना ढकलून मी दरवाज्याकडे पळण्याचा प्रयत्न केला पण मला ते शक्य झालं नाही. नशिबाने तेव्हा कोणीतरी दार वाजवलं पण या प्रसंगाबाबत कोणाला काहीच न सांगण्याची धमकी त्यांनी मला दिली होती. नंतर मला घरी सोडताना त्यांनी पुन्हा गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला,’ असं त्या महिलेनं सांगितलं.
दरम्यान अनू मलिकने सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडितचे आरोप फेटाळून लावले आहेत.