नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांना ‘पदच्युत’ करण्याची शिफारस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – दांडियाच्या आयोजनासाठी दिलेली पाच लाख रुपयांची मंजुरी व पालिकेच्या दैनंदिन कर वसुलीत नियमांचा भंग केल्याप्रकरणी ठपका श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी आदिक यांना पदावरून दूर करण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. यावर अनुराधा आदिक यांचे लेखी म्हणणे मागवण्यात आले आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नगराध्यक्षा आदिक यांनी विविध नियमाचा भंग केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष संजय फंड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मुजफ्फर शेख व दिलीप नागरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. शिक्षण मंडळ आणि पालिकेच्या आस्थापनेवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वत:च्या सहीने बदली केली. सर्वसाधारण सभा तीन महिन्यानंतर घेतल्याचा नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यावर आरोप करण्यात आला होता. दैैनंदिन कर वसुलीत पालिकेच्या लाखो रुपयांचे नुकसान झाले. निविदा प्रक्रियेमध्ये सरकारच्या सूचनांचे उल्लंघन केले.

शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, श्रीरामपूर प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी याप्रकरणांची चौकशी केली. चौकशीनंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे त्यांनी अहवाल सादर केला. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सदर अहवाल अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला. विभागीय आयुक्तांनी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यावर नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यांनी अनुराधा आदिक यांना पदावरून दूर करण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे.

नगरविकास विभागाची नोटीस
नगरविकास विभागाने ८ ऑगस्ट रोजी नोटीस बजावण्यात आली आहे. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचे वर्तन पदाला अशोभनीय आहे. या गंभीर स्वरुपाच्या अनियमिततेबाबत पदावरून दूर करून पुढील सहा वर्षांच्या कालावधीसाठी नगरसेवक अथवा इतर स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यापासून अपात्र का करू नये, याबाबत म्हणणे मागविण्यात आले आहे. १५ दिवसांमध्ये नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांसमोर अनुराधा आदिक यांना लेखी म्हणणे मांडायचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त