मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीची लवकरच घोषणा, दिल्लीत हालचालींना वेग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई काँग्रेस (Mumbai Congress) अध्यक्ष (President) नियुक्तीला (Appointment) आता वेग आला आहे लवकरच नव्या अध्यक्षांची निवड जाहिर (Announce) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीसाठी गुरुवारी (दि.17) दुपारी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ व महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यात सुमारे दीड तास महत्त्वाची बैठक झाली. मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदासाठी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत सिंह मनहास आणि कामगार नेते भाई जगताप, माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी या तिघांची नवा आघाडीवर आहेत. या बैठकीत त्यांच्या नावावर सविस्तर चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदासाठी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत सिंग मनहास आणि कामगार नेते भाई जगताप, माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी या तिघांमध्ये चूरस आहे. आजच्या बैठकीचा अहवाल काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमोर ठेवण्यात येणार असून मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय त्या घेणार आहेत.

मुंबई काँग्रेस अध्यक्षांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर मुंबईत आले होते. त्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीबद्दल मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. एच.के पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री, विद्यमान मंत्री, यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. यावेळी त्यांनी अनेकांची मते जाणून घेतली होती. या सर्वांनी डॉ. मनहास यांच्या नावाला पसंती दिल्याचे सुत्रांनी सांगितले.