सुट्टीवर आलेल्या जवानावर तलवारीने हल्ला

उस्मानाबाद , पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य दलातील जवान सुट्टीवर आल्यानंतर गावातील पाच ते सात गावगुंडांनी पूर्व वैमनस्यातून तलवार, काठ्या व दगडाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथे शुक्रवार, 22 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. बालाजी विकास गुरव असे जवानाचे नाव असून दिवसभर सोशल मीडियावर या घटनेचा निषेध व्यक्त होत होता. तुळजापूर पोलिसांत रात्री उशिरापर्यंत कसल्याही प्रकारचा गुन्हा नोंद झाला नव्हता, हे विशेष.
दिंडेगाव येथील जवान बालाजी विलास गुरव (वय 25, रा. दिंडेगाव) हे मागील चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात भरती झाले. सध्या ते पंजाब येथे देशसेवेत आहेत. एक महिन्याची सुट्टी मिळाल्याने ते गावी आले होते. त्यांची जम्मू काश्मिर येथे बदली झाल्याने सोमवार, 25 फेब्रुवारीला ते जाणार होते. परंतु शुक्रवार, 22 फेब्रुवारी रोजी गावातच राहणार्‍या आत्त्याकडे रात्री 8 वाजता सोबत दोन मित्र घेऊन भेटण्यासाठी गेले. आत्त्याशी गप्पागोष्टी करून जवान बालाजी गुरव आपल्या दोन मित्रांसोबत घरी निघाले असता तानाजी गुरव यांच्या घरासमोर आल्यानंतर अगोदरच दबा धरून बसलेल्या हरी मचाले राहुल मचाले, कल्लेश्वर मचाले, मारुती काशीद, दत्ता मचाले व इतर अशा पाच ते सात जणांनी हातात तलवार, काठ्या, दगड आदींचा शस्त्र म्हणून वापर करून बालाजी गुरव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. जवान बालाजी गुरव यांच्या डोक्यात जबर मार लागल्याने ते रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडले. जवान यांच्यासोबत असलेले पंकज वसंत गुरव (वय 27 ) व गणेश विश्वनाथ पाटील (वय 22) यांनाही या मारहाणीत सोडवणूक करताना जबर मारहाण झाली.
दिंडेगावच्या पोलीस पाटलाने नळदुर्ग पोलीस ठाणे व इटकळ पोस्ट येथे दिली असता, घटनास्थळी पोलीस दाखल झाले. जखमी जवान बालाजी गुरव यांना उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय हॉस्पिटलला पाठवले. जखमी जवान बालाजी गुरव हे अविवाहित आहेत. डोळ्यात तेल घालून अहोरात्र देशसेवा बजावणार्‍या या जवानांवर प्राणघातक हल्ला झाल्याने गांव परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अद्याप या घटनेची नोंद पोलिसात झाली नसल्याचे समजते. त्यामुळे आरोपी ही मोकाटच आहेत. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, असा आक्रोश जवान यांच्या कुटुंबाकडून केला जात आहे.