‘त्या’ फार्म हाऊस वर घडले असे काही…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पनवेलच्या बारमध्ये काम करणाऱ्या चार बारबाला पुण्यात येतात. त्यांना पुण्याजवळच्या एका रंगेल नेत्याने एका मित्राच्या मदतीने मावळातील फार्म हाऊसवर बोलवले. त्यानंतर त्यातील एकीवर पिस्तूल रोखत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे बिथरलेल्या बारबालांनी वाट फुटेल तिकडे पळ काढला. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी फळणे गावातील दोन तरुणांकडे याचना केली. मात्र, त्या रंगेल नेत्याने आणि त्याच्या साथीदाराने चारचाकीने पाठलाग करत त्या दोघा तरुणांनाही पिस्तूलाचा धाक दाखवला. शेवटी त्या चौघींनी गावातील मंदिराचा आसरा घेतला. गावकऱ्यांनाही चाहूल लागल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर त्यांची सुटका झाली हा प्रकार वडगाव मावळला शुक्रवारी रात्री घडला. मात्र, हा रंगेल नेता कोण, त्याला नेमकं कोण पाठीशी घालतय याची चर्चा मात्र जोरदार रंगली आहे.

पनवेलच्या डान्सबार मध्ये काम करणाऱ्या चार बारबाला काम आटोपल्यानंतर गुरुवारी रात्री पुण्यातील पबमध्ये आल्या. रात्रभर पबमध्ये थांबून त्या शुक्रवारी सकाळी एका मित्राच्या सदनिकेवर विश्रांतीसाठी गेल्या. त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास त्या पनवेलकडे जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी त्यांच्यातील एकीला मित्राचा फोन आला. त्याने वडगाव मावळ येथे एका फार्म हाऊसवर येण्याचे निमंत्रण दिले. चौघी तळेगावला गेल्या. तेथे त्यांना घ्यायला एक मोटार आली. त्या मोटारीने त्यांना फळणे येथील इंद्रायणीच्या काठावर असलेल्या फार्म हाऊसवर नेले. रात्री साडेआठच्या सुमारास तेथे त्यांच्या मित्राबरोबर एकजण होता. त्याच्याबरोबर त्यांनी पार्टी सुरु केली. मात्र, त्याने त्यातील एकीला दारू पाजली. तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार दिला याच रागातून त्याने तिच्यावर पिस्तूल रोखून धमकी देत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

अचानक घडलेल्या या सर्व प्रकारामुळे चौघीही बिथरल्या. आणि तेथून जिवाच्या आकांताने पळ काढला. रात्रीच्या अंधारात वाट मिळेल तिकडे पळू लागल्या. खेड असल्याने सर्वत्र लवकरच शांत झालेलं. मात्र त्या दोघांनी चौघींचा मोटारीतून पाठलाग सुरुच ठेवला. त्या चौघी पळत असतानाच त्यांना गावातील दोन तरुण दिसले. त्यांनी दोघांकडे मदत मागितली. मात्र पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांनाही पिस्तुलाचा धाक दाखवला. चौघींना काय करावे सुचत नव्हते. तेवढ्यात गावातील मंदिर दिसले. चौघी तिथे लपल्या. मात्र याची चाहूल गावकऱ्यांना लागली. गावातील तरुणांनी लागलीच वडगाव पोलिसांना माहिती दिली. रात्री बारा वाजता पोलिसांचे एक पथक फळणे गावात दाखल झाले. त्यांनी चौघींची सुटका केली. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात पिडीत बारबालांपैकी एकीने के. के. ऊर्फ अमित आणि त्याच्याबरोबर असलेल्या एका रंगेलाविरोधात फिर्याद दिली आहे. के.के. हा त्याचे नाव काहीतरी राजकिय पुढाऱ्याप्रमाणे उच्चारत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.