नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

आडुळ/औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – यंदा अवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान, बँकेचे कर्ज (Debt), पिक लावगडीसाठी घेतलेले उसने पैसे यामुळे कर्जबाजारी झालेल्या एका 58 वर्षीय शेतकऱ्याने (Farmer) स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील आडुळ या गावात आज (सोमवार) सकाळी नऊच्या सुमारास घडली. अशोक गोविंदराव भावले असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अशोक भावले यांनी स्वत: च्या शेतातील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची आडुळ बु. गावालगत जमीन आहे. यावर येथील एका राष्ट्रीयकृत बँकेचे थकित कर्ज होते. या थकित कर्जाचा अद्यापपर्यंत त्यांना त्याचा लाभ मिळाला नव्हता. तसेच या वर्षी वारंवार झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे अतोनात मोठे नुकसान झाले होते. झालेला खर्च ही शेताच्या उत्पन्नातून निघाला नसल्याने त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. कर्ज कसे फेडायचे या चिंतेत ते राहात होते.

सध्यस्थितीमध्ये अतिवृष्टीने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशी उपटून गहू पिकाची पेरणी केली. मात्र त्यावर देखील तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हे पिक वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचल आपले आयुष्य संपवले. आज सकाळी शेतात जाणाऱ्या इतर मजुरांना रस्त्याच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडाला अशोक यांचा मृतदेह लटकलेला आढळून आला.

या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. अशोक भावले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.