काय सांगता ! होय, महापालिकेच्या साऊंड सिस्टीमचं बील तब्बल 35 लाखांपेक्षा जास्त, जाणून घ्या भानगड

औरंगाबाद: पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद महापालिकेची आर्थिक अवस्था अतिशय गंभीर आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुल होत नाही असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्यातच आता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी  भाडेतत्वावर घेण्यात येत असलेल्या साऊंड सिस्टीमचे गेल्या पाच वर्षांत संबंधित ठेकेदाराला तब्ब्ल ३५ लाखांपेक्षा अधिक रकमेचे बिल अदा केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान,  एकीकडे कोरोनामुळे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेची आर्थिक घडी बिघडली असताना  औरंगाबाद महापालिकेतील  लाखो रुपयांची उधळपट्टी कोणीही थांबवायला तयार नाही.

२०१५ ते २०२० या पाच वर्षांमध्ये महापालिकेच्या किमान ६० ते ७० सभा झाल्या. प्रत्येक सभेसाठी खाजगी कंत्राटदाराची साऊंड सिस्टीम मागविण्यात येते.सभा संपल्यावर कंत्राटदार साऊंड सिस्टीम घेऊन जातो. एका सभेचे भाडे कंत्राटदाराला आकारण्यात येते. या साऊंड सिस्टिमचा  वार्षिक खर्च  ७ लाख रुपये आहे. पाच वर्षात जवळपास ३५ लाख रुपये साऊंड सिस्टीम सांभाळणाऱ्या कंत्राटदाराला देण्यात आले. विशेष बाब म्हणजे गेल्या पाच वर्षात सत्ताधारी किंवा विरोधक कोणीही या प्रक्रियेला जराही विरोध केलाला नाही

महापालिकेने आतापर्यंत जेवढी रक्कम अदा केली त्यातील ५० टक्के रकमेमध्ये अद्यावत साऊंड सिस्टिमची यंत्रणा खरेदी करता आली असती. महापालिकेच्या विद्युत विभागाकडे साऊंड सिस्टीम बसविणारे आणि हाताळणारे कुशल कर्मचारी आहेत. परंतु एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकाचे कंत्राटदारावर वरदहस्त असल्यामुळे प्रशासनाने कधीही साऊंड सिस्टिमला विरोध केला नाही. हे विशेष.