औरंगाबाद : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

औरंगाबाद (aurangabad ) : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार झाले. बीड बायपास परिसरातील सुर्या लॉन्सजवळ बुधवारी (दि. 27) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून पसार झाला. त्यानंतर जमावाने ट्रकवर दगडफेक करून ट्रकचे मोठे नुकसान केले.

सचिन कल्याण राठोड (वय 32) नितेश पुंडलिक पवार (25 दोघे रा. पोरगाव तांडा, ता. पैठण, ह.मु नाईक नगर, बंजारा हीलजवळ शिवाजीनगर) असे अपघातात मृत झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत.

पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन व नितेश हे दोघेही देवळाई येथील कंत्राटदार बाबा भाई यांच्याकडे जेसीबी चालक म्हणून काम करत होते. बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोघेही दुचाकीवरून बीड बायपास रस्त्याने पैठणकडे जात असताना सुर्या लॉन्स समोर त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याने दोघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून पुंडलिकनगर पोलिस शोध घेत आहेत.