Badlapur News : 3 पाळीव कुत्र्यांसह एकाची पेटवून घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

बदलापूर: पोलीसनामा ऑनलाईन – एका व्यक्तीने घराचे दार बंद करून तीन पाळीव कुत्र्यांसह स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. बदलापूर येथील रितू वर्ल्ड या गृहसंकुलातील सी विंगमधील सातव्या मजल्यावर शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी ही घटना घडली. या आत्महत्येचे कारण अद्यापही समोर आले नाही.

सत्यप्रित चॅटर्जी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. चटर्जी हे रितू वर्ल्ड इमारतीत भाडेतत्त्वावर घर घेऊन राहत होते. शुक्रवारी सायंकाळच्या वेळेस चॅटर्जी यांनी घरातील बेडरूमला कडी लावली आणि स्वतःला पेटवून घेतले. त्यावेळी बेडरूममध्ये तीन पाळीव कुत्रेदेखील होते. आग भीषण असल्याने चॅटर्जी आणि त्यांचे तिन्ही कुत्रे पूर्णपणे आगीत होरपळले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडून आग नियंत्रणात आली. आग पूर्ण आटोक्यात आल्यानंतर पाहणी केली असता चॅटर्जी आणि त्यांच्यासोबत तीन कुत्र्यांचे मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.