पुन्हा बाळासाहेब ठाकरे बनणं अशक्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अक्षय पुराणिक) – आज बाळासाहेबांची ९३ वी जयंती त्याविषयी पुणे पोलीसनामाकडून बाळासाहेबांबद्दल एक स्पेशल रिपोर्ट… बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे २३ जानेवारी १९२६ मध्ये पुण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला.
कुटुंबाचा आनुवंशिक असलेला हा गुण अवगत करायला बाळासाहेबांना जास्त वेळ लागला नाही. त्यांनी सर्वप्रथम एक कलाकार  (व्यंगचित्रकार) म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या सगळ्या  व्यंगचित्रापैकी  इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा त्यांना आवडती होती.

पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा.अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली.
महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९६० पासून ते आजपर्यंत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर बाळासाहेबांच्या ‘मार्मिक’ ची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. प्रसिद्ध व्यंगचित्रकार, “मार्मिक‘ आणि “सामना‘चे संपादक म्हणून महाराष्ट्रात दबदबा असणारे बाळासाहेब ठाकरे लहान मुलांसाठीच्या “श्‍याम‘ या पाक्षिकाचे संपादक होते. ते मुलांसाठी खास व्यंगचित्रे रेखाटायचे.
अनेक नेते येतात आणि जातात. निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे होते.
बाळासाहेबांच्या योजना

झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, Bombayचे Mumbai असे स्पेलिंग… अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या तथाकथित संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. बाळासाहेबांनी राजकारणात (सत्ताकारणात) जात या घटकाचा अजिबात विचार केला नाही. तसेच त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले. त्यामुळेच अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापदे प्राप्त झाली, होत आहेत. हाच इतर पक्षांत व शिवसेनेत आणि इतर नेत्यांत व बाळासाहेबांमध्ये असलेला फरक होय.
बाळासाहेबांनी घडवले अनेक नेते

जातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था – साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटिल राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे, अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, सुरेश प्रभु, आनंद दिघे, दत्ताजी नलावडे, नारायण राणे …. असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची – सत्ताकारणाची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.
आजचा दिवस खास आहे. बाळासाहेबांची ९३ वी जयंती आज नेहमीच्याच थाटात साजरा होत आहे. शतके बदलतील, पिढय़ा बदलतील, पण बाळासाहेबांचा जन्मदिवस साजरा होत राहील. यालाच अमरत्व म्हणतात. हे अमरत्व बाळासाहेब जन्मतःच सोबत घेऊन आले. बाळासाहेबांचा जन्म हा एका तेजाचा जन्म होता. म्हणून ‘तेज’ घेऊन शिवसेना आजही उभी आहे. शिवसेना संपविण्याचा विडा उचलून महाराष्ट्रात अनेक अफजलखान आले व उताणे पडले. शिवसेनेला राजकीय मैदानात ‘पटकण्या’ची पोकळ डरकाळी फोडणारेही काळाच्या ओघात नष्ट झाले. शिवसेना ही लेच्यापेच्यांची संघटना नाही. म्हणून लढा भूमिपुत्रांचा असो नाहीतर हिंदुत्व रक्षणाचा, मर्दांच्या सेनापती  प्रमाणेच बाळासाहेब वावरले.
शिवसेनेची स्थापना भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी झाली. हा लढा घटनेच्या चौकटीत राहूनच त्यांनी सुरू केला. भाषावर प्रांतरचना घटनेनुसार झाली. त्याप्रमाणे इतर भाषकांना त्यांची राज्ये मिळाली. महाराष्ट्राला मात्र द्विभाषिक रेडय़ाचे लोढणे मिळाले. पुन्हा मुंबईवरील मराठी माणसाचा हक्क नाकारला गेला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळावा यासाठी मराठीजनांना लढा द्यावा लागला. पोलिसांच्या लाठय़ा खाव्या लागल्या. पण बाळासाहेब खंबीर होते कारण ते सरळ साफ होते . त्यांनी लपवाछपवीचा खेळ केला नाही. कारण विचार आणि कृतीत भेसळ नव्हती. या देशात मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती होणे कठीण नाही, पण बाळासाहेब ठाकरे फक्त जन्मावे लागतात.

अनेक नेते येतात आणि जातात. निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे होते.
बाळासाहेबांवरील साहित्य

जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे – पुस्तक – लेखक प्रकाश अकोलकर.
पहिला हिंदुहृदयसम्राट – पुस्तक  -लेखक – अनंत शंकर ओगले
बाळासाहेब : ए्क अंगार – पुस्तक – लेखक – नागेश शेवाळकर
बाळासाहेब ठाकरे – पुस्तक – लेखक – यशराज पारखी
हृद्य सम्राटाची जीवनगाथा – भारत भांड यांनी लिहिलेला पोवाडा आणि गीतांची सीडी.