देशातील ‘या’ मोठ्या बँकेच्या तब्बल ८०० ते ९०० शाखा होणार बंद ? खातेदारांची डोकेदुखी वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सार्वजनिक क्षेत्रात काम करणारी दुसऱ्या क्रमांकाची संस्था म्हणजेच ‘बँक ऑफ बडोदा’च्या देशातील ८०० ते ९०० शाखा कायमस्वरूपी बंद होण्याची किंवा अन्य शाखांमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त खर्च रोखण्यासाठी काही शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देना आणि विजया बँकेच्या विलीनीकरणापासून बँक ऑफ बडोदाचा याबाबत विचार सुरू आहे.

या कारणामुळे होणार शाखा बंद –

देना व विजया बँक सोबत बँक ऑफ बडोदाचे विलीनीकरण १ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षात लागू करण्यात आले होते. देना आणि विजया बँकेच्या विलीनीकरणानंतर एकाच ठिकाणी दोन्ही बँकांच्या शाखा चालविण्यात येत होत्या. अनेक ठिकाणी तर तिन्ही बँकांच्या शाखा एकाच इमारतीमध्ये चालत असल्याचे आढळून आले. तिन्ही बँकांची प्रादेशिक आणि क्षेत्रीय कार्यालयेही एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या अतिरिक्त शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता एप्रिल पासून बँकेच्या शाखांचा आढावा घेण्यात येत असल्याचेही बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.

खातेदारांवर होणार परिणाम –

बँकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य खातेधारकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. बँकांच्या विलीनीकरणानंतर बँकेच्या शाखांचे आयएफएससी कोड बदलू शकतात. तसेच हळूहळू बँकांचे चेकबुक, खाते क्रमांक आणि कस्टमर आयडी बदलू शकतो. मात्र बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खातेधारकांचा डेटा सुरक्षित केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.

देना विजया आणि बँक ऑफ बडोदाचं विलीनीकरण झाल्यावर बँक ऑफ बडोदा एकत्रितरित्या देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक झाली आहे. सध्या बँकेच्या जवळपास ९५०० शाखा, १३,४०० एटीएम आणि ८५,००० कर्मचारी देशभरात कार्यरत आहेत.