केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी प्रयत्न करा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत, मात्र, केवळ आधुनिक बनण्यापेक्षा प्रयत्न करा. आधुनिकीकरण झाले म्हणून आपली मातृभूमी, मातृभाषा आणि संस्कृतीला विसरु नका. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेचा आग्रह धरा, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमोहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. श्यामकांत देशमुख, सहकार्यवाहक प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. सुरेश तोडकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव इत्यादी उपस्थित होते. यावेळी सेंट्रल सॉफिस्टिकेटेड अ‍ॅनालॅटिकल इन्स्टुमेंटेशन फॅसिलिटी आणि प्रिन्सिपल व्हर्च्युअल केबिन याचे डिजिटल स्वरुपात अनावरण करण्यात आले.

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, नाविन्यपूर्ण गोष्टींचे ज्ञान ग्रहण करुन विद्यार्थ्यांनी विद्वान बनावे. प्राचिन काळापासून भारत अनेक गोष्टींमध्ये अग्रेसर असून येणाऱ्या काळात आपण सर्वात पुढे राहू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशहितासाठी करावा. नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी देखील प्रयत्न करावेत असे कोश्यारी यांनी म्हटले आहे.

कुलगुरू डॉ. करमळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देऊन त्यांना दर्जेदार शिक्षण देणे तसेच त्यांना आपल्या शैक्षणिक संस्थेत टिकवून ठेवणे हे आव्हान असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. तर महाविद्यालयांना पूर्ण क्षमतेने काम करु दिले पाहिजे, असे डॉ. गजानन एकबोटे यांनी म्हटले. त्यावर राज्यपाल आणि कुलगुरू यांनी सहमती दर्शवली.