TipTop दिसणार्‍या युवतीची फ्रेन्ड रिक्वेस्ट, चॅटिंग स्टार्ट झाल्यानंतर व्हिडिओ कॉलिंग अन् युवक हळूच हनी ट्रॅपमध्ये अडकतो

किरकटवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकवून किरकटवाडी व खडकवासला परिसरातील अनेक तरुणांकडून पैशाची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात काही तरुणांनी सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार नोंद केली आहे. तर बदनामीच्या भीतीने काही जण तक्रार देण्यास टाळाटाळ करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुकवरुन सुंदर प्रोफाइल फोटो असलेल्या तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. आकर्षणापोटी तरुणांकडून फ्रेंड रिक्वेस्ट घेतली जाते. त्यानंतर ऑनलाइन संभाषण सुरु होते. संभाषण वाढल्यानंतर व्हिडीओ कॉल होतो आणि तरुण अलगदपणे ‘हनी ट्रॅप’ मध्ये फसला जातो. अशाप्रकारे व्हिडीओ कॉलवर झालेले अश्लील संभाषण नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत दहा हजारांपासून ते पन्नास हजारांपर्यंत पैशाची मागणी करण्यात येते.

विशेष बाब अशी की संभाषण झाले नसले तरी एडिट करुन अश्लील भाग संभाषणाला जोडला जात आहे. मात्र, तरुणांना शारीरिक आकर्षणाची आणि सौंदर्यला भुलण्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. तसेच बदनामीच्या भीतीने तरुण तडजोड करत पैसे देण्यास तयार होताना दिसत आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून फेसबुक प्रोफाईलवरील माहिती चोरुन दुसऱ्यांच्या नावाने बनावट अकाउंट सुरु करण्याचे प्रकार वाढले आहेत. बनावट अकाउंट सुरु करुन मूळ व्यक्तीच्या फ्रेंड लिस्टमधील अन्य लोकांना रिक्वेस्ट टाकण्यात येते. फ्रेंड रिक्वेस्ट घेतल्यानंतर फेसबुक मेसेंजरवरुन भावनिक मेसेज करुन पैशांची मागणी केली जाते. म्हणूनच फेसबुकवरील खासगी माहिती चोरीला जाऊ नये यासाठी फेसबुक अकाउंट लॉक करुन ठेवावे. त्याचप्रमाणे पैशांची मागणी झाल्यास संबंधित व्यक्तींशी प्रत्यक्ष फोनद्वारे चर्चा करावी, असेही आवाहन करण्यात आले.

तरुणांसोबत इतर वयोगटातील पुरुषही अशा प्रकारच्या फसवणुकीला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. ब्लँकमेल करत पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण सायबर क्राईम पोलीस ठाण्याचे अर्जुन मोहिते यांनी दिली.