धनंजय मुंडे यांच्या विरूद्ध पुढील महिन्यात आरोपपत्र दाखल करणार 

उस्मानाबाद :  पोलीसनामा ऑनलाईन – विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. जगमित्र साखर कारखान्याच्या जमिनीचा धनादेश न वटल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात डिसेंबर महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकारने यासंदर्भात माहिती दिली.

बीड जिल्ह्यातील तळणी तालुक्यातल्या अंबाजोगाईच्या मुंजा किसनराव गीते यांची तीन हेक्टर बारा आर जमीन जगमित्र कारखान्यासाठी घेतली होती. त्यासाठी धनंजय मुंडे यांनी 50 लाख रुपयांचा चेक दिला होता. गीते यांच्या मुलांना साखर कारखान्यात नोकरीची हमीही देण्यात आली होती.धनंजय मुंडे यांनी दिलेला ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या परळी शाखेचा धनादेश वटला नाही. त्यानंतर तीन वर्ष पाठपुरावा करुनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे गीते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेले.खंडपीठात जाण्याआधी गीते यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, परंतु तक्रार दाखल झाली नाही. त्यानंतर गीते पुन्हा खंडपीठात गेले आणि खंडपीठातून गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावरती राज्य सरकार कधी आरोपपत्र दाखल करणार, असं खंडपीठानं विचारल्यावर राज्य सरकारने पुढच्या महिन्यात धनंजय मुंडे यांच्यावर दोषारोपपत्र दाखल होईल, असं कोर्टाला सांगितलं आहे.