बीड : शेत नांगरण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात कोरोना बाधित रुग्णाने केली तोंडावर थुंकून मारहाण

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात बेड्स उपलब्ध होत नाही. ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. अशा रुग्णांना होमक्वारंटाईन करुन उपचार केले जात आहेत. अशातच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक कोरोना संक्रमित रुग्णाने एक धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आले आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, केज तालुक्यातील सारुकवाडी येथे शेत नांगरण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात कोरोना बाधित रुग्णाने तोंडावर थुंकून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 30 एप्रिल) रोजी घडली आहे. याप्रकरणी रविवारी (दि.2) केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील सारुकवाडी येथे सुभाष बळीराम फुंदे व त्याची आई कुसुम बळीराम फुंदे हे दोघे कोरोना संक्रमित असून ते होमक्वारंटाईन आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीच औषधो उपचार सुरु आहेत. याच दरम्यान शुक्रवारी सुभाषचा चुलत भाऊ श्रीराम पांडुरंग फुंदे व त्यांचा मुलगा दीपक फुंदे हे दोघे बाप-लेक आपल्या मालकीच्या शेतात काम करत होते. तर सुभाष शेतात नांगरणी करत होता.

यावेळी चुलत भाऊ दीपक फुंदे सुभाषला म्हणाला, तू आमच्या मालकीचं शेत नांगरु नको, तुझ्यात शेताची नांगरणी कर, यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. यानंतर संतापलेल्या कोरोना बाधित सुभाषने आपल्या तोंडाचा मास्क काढून चुलत भाऊ दीपकच्या अंगावर थुंकला. यावरुन दोन्ही परिवारात जोरदार मारामारी झाली. याप्रकरणी श्रीराम फुंदे यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी बळीराम फुंदे, सुभाष फुंदे, कुसुम फुंदे, उषा फुंदे या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास केज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अमोल गायकवाड करत आहेत.