जंगलात मिळाली ‘दुर्मिळ’ मांजर, एक डोळा निळा तर एक पिवळा, किंमत जाणून व्हाल ‘चकित’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील बैतूल येथे एका दुर्मिळ प्रजातीची मांजर आढळल्यामुळे सगळ्यांना कुतूहल वाटत आहे. लोक या मांजरीला पाहण्यासाठी येत आहेत. या पांढर्‍या रंगाच्या मांजरीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे डोळे. तिचा एक डोळा निळा आणि दुसरा सोनेरी आहे. या सुंदर मांजरीने एका कुटुंबाला भुरळ घातली आहे आणि आता ती त्या कुटुंबाची एक सदस्य झाली आहे.

वास्तविक, हे प्रकरण बैतूलच्या सारणीचे आहे. जिथे राहत असलेले अनुभव सिंह दोन महिन्यांपूर्वी भोपाळहून जेव्हा सारणीकडे जात होते तेव्हा काही कामानिमित्त जंगलाच्या वाटेवर एका ठिकाणी थांबले. तेथे त्यांनी पाहिले की एक मांजर झाडावर बसलेले होते आणि खाली एका कुत्र्याने तिला घेरलेले होते. मांजरीचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी प्रथम त्या कुत्र्याला तेथून हाकलले आणि नंतर या मांजरीला घेऊन ते घरी आले.

घरी आल्यावर जेव्हा अनुभव सिंह यांनी बघितले की ही मांजर काहीशी वेगळी आहे. पांढर्‍या मांजरीचा एक डोळा निळ्या रंगाचा होता आणि दुसरा डोळा सोनेरी रंगाचा होता. या मांजरीला पाहून कुटुंबातील इतर सदस्यही खूष झाले आणि त्यांनी या मांजरीला पाळण्याचा निर्णय घेतला. आता मांजर या कुटुंबाची सदस्य बनली आहे. कुटूंबाने या मांजरीचे नाव हैजल ठेवले आहे आणि कुटुंबीय तिला प्रेमाने हैजी म्हणून हाक मारतात.

जेव्हा अनुभव यांनी या अनोख्या मांजरीबद्दल इंटरनेटवर शोध घेतला तेव्हा त्यांना समजले की ती एक फार दुर्मिळ मांजर आहे आणि भारतात तिचे अस्तित्व नाहीत जमा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तिची किंमत डॉलरमध्ये असल्याचे त्यांना समजले, जी भारतीय चलनानुसार पाच ते सात लाख रुपये इतकी आहे. ही मांजर त्यांना भेटल्यामुळे ते स्वत:ला भाग्यवान समजू लागले आहेत.

बैतूल जेएच कॉलेजचे बायोटेक्नॉलॉजी विभागाचे एचओडी सुखदेव डोंगरे म्हणतात की यास खाओ मनी कॅट (Khao Manee cat) म्हणतात. ही मांजर सहसा थायलंडमध्ये आढळते, तिचा इतिहास 100 वर्षांपूर्वीचा आहे. अत्यंत दुर्मिळ अशा या मांजरीचे वैशिष्ट्य म्हणजे ती खूप हुशार आणि चंचल असते. या मांजरीची प्रजाती वाढविण्यासाठी विशेष ब्रीडिंग केले जात आहे. या मांजरीबद्दल मिळालेली माहिती अशी आहे की तिच्या डोळ्यांची जी आयरिसची रचना असते त्यानुसार तिचे डोळे वेगवेगळ्या रंगाचे होतात. हे वैशिष्ट्य जन्मजात असते. वेगवेगळ्या रंगाच्या डोळ्यांची मांजर लाखांमध्ये एक असते.