भजन सम्राट अनूप जलोटा आता थेट सत्य साईबाबांच्या भूमिकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  Bigg Boss मध्ये आपल्या निम्म्या वयाच्या जसलीनबरोबर रोमॅन्स केल्यानंतर आता प्रसिद्ध गायक आणि भजन सम्राट अनूप जलोटा हे आपल्याला थेट पडद्यावर सत्य साईबाबा साकारताना दिसणार आहेत. आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटात अनूप जलोटा मुख्य भूमिकेत आहेत. स्वतः जलोटा देखील सत्य साई बाबांचे अनुयायी होते, अशी माहिती त्यांनी नुकतीच दिली आहे. जलोटा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रमोशन करतानाही सत्य साई बाबा यांच्या वेशातच विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असून त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

एका माध्यम संस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनूप जलोटा म्हणाले की, 55 वर्षांपूर्वी सत्य साई बाबांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यावेळी ते बाबाला भेटले होते तेव्हा ते 12 वर्षाचे होते. यावेळी जलोटा यांनी बाबांसोबतच्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे. आम्ही सर्वप्रथम सत्य साईबाबांना लखनऊला असताना भेटलो. यावेळी त्यांनी माझ्या वडिलांच भजन ऐकले आणि आम्हाला आशीर्वाद दिला. त्यानंतर साई बाबा माझ्या वडिलांच्या संपर्कात होते. त्यांना भेटण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी गेलो होतो. मुंबई, बेंगळुरू, दिल्ली आणि उटी या ठिकाणीही त्यांची भेट घेतली होती.

ते पुढे म्हणाले की, सत्य साई बाबा त्यांना ‘छोटे बाबा’ म्हणून हाक मारायचे. त्यावेळी मी त्यांना विचारल होते की, मला तुम्ही छोटे बाबा का म्हणता? तेव्हा त्यांनी मला म्हटले होते. एका दिवशी तुला याची जाणीव नक्की होईल. आता मला याची जाणीव झाली आहे, कारण मी त्यांची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर निभावणार आहे. चित्रपटाच्या बाबतीत बोलताना त्यांनी सांगितले की, मला वाटतय की, मी त्यांच्या पात्राला योग्य न्याय देवू शकेल. कारण मीही त्यांच्या अनुयायांपैकीच एक आहे. त्यामुळे मला ते कसे बोलतात, कसे चालतात, कसे बसतात हे माहित आहे.