Bhandup Hospital Fire :… म्हणून महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त आहे का? भाजप नेत्याचा सवाल

मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील 10 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले आहे. भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी महापालिका आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भांडुप ड्रीम मॉलमध्ये अनधिकृतपणे सनराईज कोविड सेंटर उभे राहते याची साधी माहिती देखील महापालिकेला नसल्याचे स्वत: महापौर कबूल करतात. या ड्रीम मॉलमध्ये पीएमसी बँक घोटाळ्याचे सूत्रधार असलेल्या वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्याने शिवसेनेने या मॉलवर व अनधिकृतपणे उभे राहिलेल्या सनराईज हॉस्पिटलवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे का ? असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, मॉल व हॉस्पिटलच्या संचालक व व्यवस्थापकीय मंडळासोबतच हा मॉल व हॉस्पिटल बेकायदेशीर पणे सुरु ठेवण्यासाठी ज्यांचा वरदहस्त आहे, त्यांची देखील सखोल चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. तसेच ज्यावेळी भंडारा येथे जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर मी मुंबईतील सर्व खासगी व सरकारी रुग्णालयाचे फायर ऑडिट करुन घेण्याची मागणी केली होती. त्यावेळी समोर आलेल्या माहितीमध्ये मुंबईत 1390 रुग्णालये व नर्सिंग होम अनधिकृतपणे सुरु असल्याची धक्कादयक माहिती समोर आली होती. तसेच या ठिकाणी कोणतीही आगरोधक सुरक्षा नसल्याचे समोर आले होते, असे भातखळकर यांनी सांगितले.

आतुल भातखळकर पुढे म्हणाले, मुंबईत करण्यात आलेल्या एका सर्वेमध्ये 29 मॉलमध्ये आगरोधक सुरक्षा कुचकामी असल्याची माहिती समोर आली होती. आज ज्या ड्रीम मॉलला आग लागली आहे त्याचा सुद्धा या यादीमध्ये समावेश होता. आज मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाख रुपये द्यावेत. हे पैसे रुग्णालय आणि मॉलकडून वसूल करावेत, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.