चीनला व्यावसायिकरित्या मोठा झटका ! 24 मोबाईल कंपन्यात करताहेत भारतात येण्याची तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून आपला व्यवसाय हलवणार्‍या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी भारताने अलीकडे केलेल्या घोषणा काम करताना दिसत आहेत. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स ते ऍपलपर्यंतच्या असेंब्ली भागीदारांनी भारतात गुंतवणूक करण्यात रस दाखवला आहे. मार्चमध्ये मोदी सरकारने इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांना अनेक प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. याचा परिणाम म्हणून सुमारे दोन डझन कंपन्यांनी भारतात मोबाइल फोन कारखाने सुरू करण्यासाठी १.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे.

सॅमसंग व्यतिरिक्त ज्या कंपन्यांनी रस दाखवला आहे, त्यात फॉक्सकॉनच्या नावाने ओळखली जाणारी कंपनी Hon Hai Precision Industry Co., विस्ट्रोन कॉर्पोरेशन (Wistron Corp.) आणि पेटाट्रॉन कॉर्पोरेशन (Petatron Corp.) यांचा समावेश आहे. भारताने फार्मास्युटिकल क्षेत्रातही अशाच प्रकारचे प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त इतरही अनेक क्षेत्रात अशा प्रकारचे प्रोत्साहन आणण्याची योजना आहे. या इतर क्षेत्रांमध्ये ऑटोमोबाईल, टेक्सटाईल आणि फूड प्रोसेसिंग क्षेत्र असू शकतात.

अमेरिका-चीन व्यापारातील तणाव आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या दरम्यान कंपन्या सक्रियपणे पुरवठा साखळीत विविधता आणण्यासाठी नवीन जागा शोधत आहेत. मात्र व्यवसाय स्वस्त करूनही भारताला मोठ्या प्रमाणात याचा फायदा झालेला नाही. व्हिएतनाम या कंपन्यांसाठी सर्वात पसंतीची जागा बनली आहे. यानंतर कंबोडिया, म्यानमार, बांगलादेश आणि थायलंड या कंपन्यांची पसंतीची ठिकाणे आहेत. ब्लूमबर्गनुसार, स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

सरकारला आशा आहे की, येत्या पाच वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात १५३ अब्ज डॉलर्सचे सामान बनवले जाऊ शकते, ज्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सुमारे १० लाख रोजगार निर्माण होतील. क्रेडिट सुईस ग्रुपच्या विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, यातून येत्या पाच वर्षांत ५५ अब्ज डॉलर्सची अतिरिक्त गुंतवणूक होईल, ज्यामुळे देशाच्या आर्थिक उत्पादनात ०.५ टक्क्यांची वाढ होईल.