मतदार यादीतून नावे वगळण्याचे राज्यात मोठे कारस्थान : पृथ्वीराज चव्हाण

कराड : पोलीसनामा आॅनलाइन – कराड दक्षिण विधानसभा मतदार संघासह राज्यातील अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत असे खोटे ऑनलाईन अर्ज करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर मलकापूर निवडणुकीत इच्छूक असणाऱ्या उमेदवारांसह कराड शहरातील अनेक मतदारांबाबत असा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मी स्वत: आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणार आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारीसह विधानसभेत हा प्रश्न मांडणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राजेंद्र यादव, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने यांच्यासह ज्यांची नावे वगळण्यासाठी अर्ज करण्यात आलेले नागरिकही उपस्थित होते. आ. चव्हाण म्हणाले, देशातील मोदी सरकार सर्व स्वायत्त संस्थामध्ये हस्तक्षेप करत असल्याचे या प्रकरणावरून पुन्हा सिध्द झाले आहे. आपल्या राजकीय वाटचालीत अडसर ठरणाऱ्यांना मतदार यादीतून हटवण्याचा हा प्रकार आहे. मला ही माझे नाव मतदार यादीत आहे का? हे तपासावे लागेल. कारण माझे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी कुणीतरी अर्ज केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.

राज्यातील कोणत्याही नागरिकाला आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करणे अथवा वगळण्याकरिता निवडणूक आयोगाने ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, ही प्रक्रिया सदोष असल्याचे समोर आले आहे. कराड दक्षिण मतदार संघातील काही नागरिकांचा नावे वगळण्याशी काही संबंध नाही. जे नागरिक राजकीय दृष्ट्या सक्रीय आहेत शिवाय होऊ घातलेल्या मलकापूरच्या निवडणुकीत जे उमेदवारी करू शकतात, अशा इच्छूक उमेदवारांची नावे वगळण्यासाठी कोणीतरी अज्ञाताने ऑनलाईन अर्ज केले आहेत. याची नोटीस आल्यानंतर ही बाब निदर्शनास आली आहे.

मलकापूर नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील ५०० हून अधिक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आले आहेत. तर कराड शहरात हा आकडा सुमारे एक हजारच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासह कराड प्रांताधिकारी, तहसीलदाराकडे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात किती नागरिकांची नावे वगळण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत याची माहिती मागवली आहे. अशा पध्दतीने नागरिकांच्या घटनात्मक अधिकारावर गंडांतर आणण्याचा हा प्रकार असून हा खटाटोप राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याचा आरोप आ. चव्हाण यांनी केला. ते म्हणाले, मतदार यादीत नाव नोंदणी करणे व वगळणे ही प्रक्रिया ऑनलाईन असल्याने असे बनावट अर्ज कोणत्या संगणकावरून करण्यात आले आहेत, हे तपासणे आता सोपे आहे. याप्रकरणी निवडणूक आयोग तसेच पोलीस यंत्रणेने तपास करावा. शिवाय मी स्वत: कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून पोलिसात गुन्हा दाखल करणार आहे.

राममंदिर बांधायचे वचन भाजपाचे, काँग्रेसवर खापर फोडू नका