पंढरपूर : भगीरथ भारत भालकेंच्या नावाची घोषणा होऊ लागताच शरद पवार म्हणाले – ‘आपल्याला…’

पोलिसनामा ऑनलाईन – दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार आज गुरुवारी पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे आले. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा उमेदवार घोषित करणार, अशी आशा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना होती. मात्र, भगीरथ भालकेंच्या नावाची घोषणा होऊ लागताच शरद पवार यांनी भाषणात,’ आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे,’ असं सांगितलं.

दरम्यान, भालके कुटुंबीयांच्या भेटीनंतर त्यांनी जमलेल्या लोकांसमोर मनोगत व्यक्त केलं. पवार बोलत असताना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार घोषित करावा, अशी मागणी भालकेंच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा पवार करतील, असे कार्यकर्त्यांना वाटलं होतं . मात्र, पवार यांनी सांगितलं की, ‘आपल्याला एकत्र बसून या विषयावर चर्चा करायची आहे. तत्काळ त्यावर बोलता येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे.’ विशेष म्हणजे या शब्दावरच पवार यांनी अधिक जोर दिला. त्यामुळे पंढरपूर मतदार संघातील उमेदवार कोण असणार? हे सध्या गुलदस्त्यात आहे.

बोलताना पुढे पवार म्हणाले, की ‘विठ्ठल’चे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार यांनी मला कारखान्याची माहिती सांगितली आहे. इथली स्थिती काळजी करण्यासारखी आहे. येथे विकासासाठी पहिल्यांदा विठ्ठल कारखान्याकडेच लक्ष केंद्रीत करणार आहे.