कोरोनानंतरच्या त्रासाला कंटाळून डॉक्टराने केली आत्महत्या

पाटणा : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाचा त्रास असह्य झाल्याने एका डॉक्टराने रुग्णालयाच्या आवासात आत्महत्या केली आहे. बिहारच्या गिध्दौरमध्ये मंगळवारी (दि. 23) ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान डॉक्टराने आत्महत्येपूर्वी लिहलेली एक चिठ्ठी सापडली आहे. यात कोरोना झाल्यामुळे माझी स्मृती काम करत नाही, झोपही लागत नाही, वेड लागल्यासारखे वाटते. त्यामुळे मी जीव देत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे.

डॉ. रामस्वरूप चौधरी (वय 63, मूळ गाव. सिंघमपूर) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. चौधरी यांनी मंगळवारी गिद्धौरमधील सार्वजिनिक आरोग्य केंद्राच्या आवासात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या 6 वर्षांपासून ते गिद्धौरच्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी त्यांना कोविड केअर सेंटरची जबाबदारी दिली होती. याचदरम्यान त्यांना कोरोना झाला. तेंव्हापासून ते खूप त्रासले होते. मंगळवारी सकाळी चहानाश्ता करून ते रुग्णालयात जाण्याची तयारी करण्यासाठी खोलीत गेले. त्यांचा ड्रायव्हर त्यांना घेण्यासाठी घरी आला होता. पण ते आपल्या खोलीतून बाहेर आलेच नाही. मग ड्रायव्हर, डॉक्टराची पत्नी आणि मुलांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. आतून काही प्रतिसाद येत नसल्याने दरवाजा तोडला असता ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.