गर्भपात सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर, विशिष्ट स्थितीत 24 आठवडयांपर्यंत गर्भपात

नवी दिल्ली : राज्यसभेत गर्भपात सुधारणा कायदा २०२० मंजूर करण्यात आला असून विशिष्ठ परिस्थितीमध्ये २४ आठ्वड्यापर्यंत गर्भपात करणे शक्य होणार आहे. या नव्या कायद्यामुळे बलात्कार पीडित, घरगुती लैंगिक अत्याचार, अल्पवयीन तसेच गतिमंद महिलांना दिलासा मिळणार आहे.

या कायदया संदर्भात जगभरातील कायद्यांचा अभ्यास करण्यात आला होता. त्याच बरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात मंत्रिगटाचीही स्थापना करण्यात आली हाेती. ५० वर्षे जुन्या कायद्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न या विधेयकातून करण्यात आला असून विचारपूर्वक हे विधेयक तयार करण्यात आले असल्याची माहिती राज्यसभेच्या चर्चेदरम्यान केंद्रीय आराेग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी दिली.

दरम्यान, विधेयकातील तरतुदींमुळे महिलांना न्याय मिळणार नाही, बलात्कारासारख्या मुद्द्यातून महिलांसाेबत संवेदनशील व्यवहार केला पाहिजे अशी भूमिका विराेधकांनी मांडली हाेती. तर सेनेच्या सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांनी वैद्यकीय मंडळाची गर्भपातासाठी परवानगी घेण्याचा मुद्दा याेग्य नसल्याचे मत मांडले हाेते.